राज्यातून मान्सूनच्या पावसाचा परतीचा प्रवास सुरू असून आता खरीप पिकांच्या काढणीच्या कामांना वेग आला आहे. शेतकऱ्यांची रब्बी हंगामाच्या मशागतीची कामे सुरू झाली आहेत.
नुकतेच राज्याच्या कृषी विभागाने पीक पेरणी अहवाल प्रसिद्ध केला आहे. यंदा कोणत्या पीकाचा पेरा कमी झाला? राज्यात खरीप हंगामात किती पाऊस झाला? काय सांगतो हा अहवाल जाणून घ्या...
यंदा राज्यात खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र (ऊस वगळून) १४२.०२ लाख हेक्टर एवढे असून ऊस पिकासह सरासरी ९४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. आता भात, नाचणी पिके फुटवे फुटण्याच्या ते निसवण्याच्या अवस्थेत आहेत. तर मूग, उडीद पिकांची काढणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. कोल्हापूर व औरंगाबाद विभागात रब्बी हंगामाच्या पेरणीस सुरुवात झाली आहे.
खरीप हंगामात किती झाले पर्जन्यमान?
१ जून ते ६ ऑक्टोबर दरम्यान राज्यातील सरासरी पाऊस ९२६.६ मि.मी म्हणजेच सरासरीच्या ९१ टक्के पावसाची नोंद झाली.
राज्यात एकूण ३५५ तालुक्यांपैकी ८९ तालुक्यांमध्ये २५ ते ५० टक्के पाऊस झाला. तर १५१ तालुक्यांमध्ये ५० ते ७५ टक्के पाऊस झाला.११३ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे.
तेलबीया वगळता पिकांचे पेरणी क्षेत्र कमी
यंदा खरीप हंगामात तेलबीया वगळता इतर पीकांची सरासरीपेक्षा कमी पेरणी झाल्याचे चित्र आहे. तेलबीयांचे एकूण सरासरी क्षेत्र ४३.९२ लाख हेक्टर होते. त्यापेक्षा ८.५३ लाख हेक्टर अधिक पेरणी झाली आहे.
तृणधान्यांची पेरणी मागील सात वर्षात सातत्याने कमी
२०२३ हे वर्ष जागतिक तृणधान्य वर्ष म्हणून यंदा साजरे केले जात असताना मागील सात वर्षात म्हणजेच २०१७ ते २०२४ पर्यंत तृणधान्यांचे पेरणी क्षेत्र हे सातत्याने घटताना दिसून येत आहे.
महाराष्ट्राचा एकूण लागवडीयोग्य क्षेत्र हे २२५ लाख हेक्टर एवढे आहे. त्यातील २०१६ ते २०२१ या पाच वर्षांचे तृणधान्यांचे म्हणजे भात, बाजरी, रागी,मका इ. सरासरी क्षेत्र हे ३४ लाख ७० हजार २७९ हेक्टर एवढे होते. मागच्या वर्षी हे क्षेत्र ३० लाख ९५ हजार ३६५ हेक्टर एवढे झाले. म्हणजेच साधारण पावणेचार लाख हेक्टरांची तूट. यावर्षी म्हणजेच २०२३-२४ वर्षी प्रत्यक्ष पेरणी ३० लाख ३६ हजार ५०४ हेक्टर एवढी पेरणी झाली.