छत्रपती संभाजीनगरमधील लाडसावंगी परिसरातील मोसंबी फळबागांवर पडलेल्या अज्ञात रोगामुळे बागा पिवळ्या पडू लागल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. त्यानंतर कृषी खात्याने बागांची तत्काळ पाहणी करून उपाययोजना करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. लाडसावंगी परिसरातील मोसंबी बागांवर पडलेल्या अज्ञात रोगाने झाडे पिवळी पडून बागा वाळत आहेत.
यावर छत्रपती संभाजीनगर तालुका कृषी विभागाचे मोसंबी फळतज्ञ डॉ. संजय पाटील, तालुका कृषी अधिकारी शाम गुळवे, मंडळ अधिकारी रोहिदास राठोड, जल अभ्यासक दत्तात्रय कोळेकर आदी अधिकारी गुरुवारी सकाळी बाबासाहेब पडूळ या शेतकऱ्यांच्या मोसंबीच्या बागेत दाखल झाले. यामागील कारणे व उपाययोजना कृषी विभागाने सांगितल्या आहेत.
...ही आहेत कारणे
रोगी झाडावरचे डोळे काढून कलम तयार करणे, मोसंबी बागांची लागवड कमी अंतरावर करणे, बागेतील गळालेली फळे तसेच पडून त्यावरील बुरशीचा प्रादुर्भाव वाढणे, बागेत कीटकनाशक फवारणी न करणे, वर्षातून एकदाच खत व्यवस्थापन करणे, जास्त प्रमाणात पाणी देणे, बागेला मोकळी हवा न मिळणे, पिकाची छाटणी करत नसल्याने घनदाट बागेत रोगाला पोषक वातावरण मिळणे आदीमुळे बागा लवकर नष्ट होत आहेत, आदी निष्कर्ष पथकाने काढले.
यावर हे आहेत उपाय
योग्य शेणखत, कीटकनाशक फवारणी करणे, बागा फळधारणेनंतर कधी झाडे खाली करावी, रासायनिक खते व ज्या खतात सोळा घटक असलेले खत कसे वापरावे, याविषयी डॉ. संजय पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. पाणी व पाण्यात असलेले बॅक्टेरिया व यावर उपाययोजना याविषयी जलअभ्यासक दत्तात्रय कोळेकर यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. यावेळी बाळासाहेब पडूळ, राजेंद्र पडूळ, बाबासाहेब पडूळ, भाऊसाहेब दाभाडे, दिनकर पडूळ, रामेश्वर बचाटे, जगन्नाथ पडूळ आदी शेतकरी हजर होते.