राज्यात शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी दुग्धव्यवसाय करतात. दुधाच्या उत्पादनाचा दर्जा जनावरांच्या आहारावर अवलंबून असल्याने पशु आहारात हिरव्या चाऱ्याला अनन्यसाधारण महत्व आहे.
जनावरांची निरोगी वाढ आणि प्रजनन क्षमता टिकवण्यासाठी हिरवा चारा आवश्यक आहे. चवदार पाचक हिरवा चारा दुधाळ जनावरांच्या आहारात नैसर्गिक स्वरूपात उपलब्ध झाल्याने जनावराला कोणत्याही प्रकारचा ताण न येता पचन होते. जनावराच्या शरिरातले तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.
कोणत्या प्रकारचा चारा शेतकऱ्यांला लावता येतो?
ज्वारी हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रीय पारंपरिक चारा पीक आहे. आवर्षणप्रवण भागात व हलक्या जमीनीत तग धरून राहण्याची क्षमता या पिकात अधिक. त्यामुळे निश्चित चारा उत्पादन देणारे पीक म्हणून या पिकाकडे पाहिले जाते.
मका
मका हे जलद वाढणारे चारा पिक असून याच्या पालेदार, सकस, रुचकर, तसेच अधिक उत्पादनक्षम, पौष्टिक शर्करायुक्त पदार्थांमुळे जनावरांची उत्पादन क्षमता वाढते. मक्याच्या चाऱ्यापासून उत्तम दर्जाचा मुरघासही तयार करता येतो. हिरव्या चाऱ्यात ९ ते ११ टक्के प्रथिनांचे प्रमाण असते.
बाजरी
बाजरी हे हलक्या ते मध्यम जमिनीत घेतले जाणारे तृणधान्य वर्गातील चारा पिक असून महात्मा फुले कृषि विद्यापीठाने जायंट बाजरा या वाणाची चाऱ्यासाठी शिफारस केलेली आहे. या वाणाचा वाढीचा कल उंच असून लुसलुशीत हिरव्या चाऱ्यात प्रथिनांचे प्रमाणे ७ ते ९ टक्के असते.
चवळी
चांगल्या निचऱ्याच्या जमिनीत चवळी या व्दिदल वर्गीय चारा पिकाची पेरणी पावसाळ्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत करावी. चवळीच्या चाऱ्यामध्ये १३ ते १५ टक्के प्रथिने असतात. पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी कापणी कराण्याचा सल्ला तज्ञ देतात. हिरव्या चाऱ्याचे २५० ते ३०० क्विंटल प्रती हेक्टरी उत्पन्न मिळते.