शेतकरी नवनव्या कल्पना विकसित करून शेतीला नव्या तंत्रज्ञानाची जोड देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. धानाच्या रोवणीनंतर २१ दिवसांनी बैलजोडीचा आधार घेत लाकडी पट्टा धानाच्या बांधीत फिरविण्यात आला. यामुळे पिकाला सुदृढता मिळून अधिक फुटवे येण्याकरिता मदत मिळते. त्याचप्रमाणे काहीअंशी तण नियंत्रणाकरितासुद्धा सहकार्य होते.
पालांदूर, ढिवरखेडा येथील होतकरू शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात प्रयोग केला आहे. नुसत्या रासायनिक खताने उत्पन्न वाढविण्यापेक्षा इतरही काही नैसर्गिक घटकांचा आधार घेत उत्पन्न वाढविले जाते. आपल्या पूर्वजांनी बैलजोडीचा आधार घेत ज्या साधनांचा वापर केला, तीच साधने आता पुन्हा वापरून अधिक उत्पन्नाकरिता प्रयत्न सुरू झालेले आहेत.
शेतकऱ्यांचे म्हणणे काय?
गत ३ वर्षापासून दोन्ही हंगामात रोवणीनंतर धानात पट्टा फिरवितो. इतरही शेतकऱ्यांना मी सहकार्य करतो. पट्टा फिरविल्याने उत्पादनात वाढ होते.- राजू शिवणकर, शेतकरी, ढिवरखेडा
शेतकरी बांधवांनी नवनवीन तंत्रज्ञान वापरणे गरजेचे आहे. धानाच्या बांधीत पट्टा फिरविणे योग्य आहे. अगदी आठ दिवसातच धानात बदल बघायला मिळतो. होतकरू शेतकऱ्यांनी हा प्रयत्न केलेला आहे.- विकास झलके, मंडळ कृषी अधिकारी, पालांदूर.
लागवडीनंतर बैलांचा पट्टा फिरवल्याने काय होते?
रोवणीनंतर किमान २२ ते ३० दिवसापर्यंत धानाच्या बांधीत पाणी ठेवून बैलांचा पट्टा फिरविला जातो. त्यामुळे धानाच्या मुळांना झटका मिळून वातावरणातील पोषकतत्त्व मिळतात. काही ठिकाणी वाढूनआलेले तणसुद्धा कमी होण्याकरिता मदत शक्य होते, बैल व शेतकऱ्याच्या चालण्यानेसुद्धा चिखलात काही अंशी निसर्गातील घटक आपोआप मिळतात. वनस्पतीला अपेक्षित निसर्गातील नायट्रोजनसह इतरही घटक मिळतात.