Lokmat Agro >शेतशिवार > अप्रमाणित आणि बोगस खतांवरून शेतकऱ्यांची होतेय दिशाभूल, जाणून घ्या वास्तव

अप्रमाणित आणि बोगस खतांवरून शेतकऱ्यांची होतेय दिशाभूल, जाणून घ्या वास्तव

what is difference between substandard and bogus fertilizers, know the reality | अप्रमाणित आणि बोगस खतांवरून शेतकऱ्यांची होतेय दिशाभूल, जाणून घ्या वास्तव

अप्रमाणित आणि बोगस खतांवरून शेतकऱ्यांची होतेय दिशाभूल, जाणून घ्या वास्तव

सरसकट ‘बोगस’ शब्द वापरून समाजमाध्यमांतून माहिती प्रसारित होत असल्याने शेतकऱ्यांची दिशाभूल होत आहे. अनेक शेतकऱ्यांमध्ये खतांच्या दर्जावरून काळजी निर्माण झाली आहे.

सरसकट ‘बोगस’ शब्द वापरून समाजमाध्यमांतून माहिती प्रसारित होत असल्याने शेतकऱ्यांची दिशाभूल होत आहे. अनेक शेतकऱ्यांमध्ये खतांच्या दर्जावरून काळजी निर्माण झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

खरीप व रब्बी हंगामात खत, बियाणे, किटकनाशके यांच्यासह कृषी निविष्ठांचा दर्जा टिकून राहावा आणि शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाच्या निविष्ठा मिळाव्यात यासाठी कृषी विभागातील निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग नियमित कारवाई करत असतो. याच कारवाईचा भाग म्हणून कृषी विभागाने अलिकडेच काही मान्यताप्राप्त खत कंपन्यांच्या नमुने ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली असता ते अप्रमाणित असल्याचे आढळून आले आहे.

मात्र यासंदर्भात सरसकट ‘बोगस खते’ असा शब्द वापरून समाजमाध्यमांतून माहिती प्रसारित होत असल्याने शेतकऱ्यांची दिशाभूल होत आहे. अनेक शेतकऱ्यांमध्ये खतांच्या दर्जावरून काळजी निर्माण झाली आहे. आपल्याला बोगस खत मिळाल्याने आपले नुकसान होईल व उत्पादनात घट होईल अशी शेतकऱ्यांमध्ये सध्या भीती पसरली आहे.  यावर बोगस आणि अप्रमाणित यामध्ये मोठा फरक असून शेतकऱ्यांनी तो समजून घेणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

यासंदर्भात राज्याचे कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) विकास पाटील यांनी ‘लोकमत ॲग्रो’ ला सांगितले की बरेचदा खतांचा आकार, रंग वगैरे गोष्टी मानकानुसार नसतात. म्हणजेच एखाद्या खताच्या दाण्यांचा आकार एकसारखा नसणे किंवा एखाद्या खतातील नत्राचे प्रमाण  अथवा रासायनिक घटकाचे प्रमाण, एक दोन टक्क्यांनी कमी-जास्त आढळणे यासारख्या गोष्टी रासायनिक उत्पादनात होतात. पण ते बोगस असते असे म्हणता येत नाही. ते अप्रमाणित असते असे म्हणता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी यातील फरक समजावून घेऊन कुठल्याही गैरसमजाला बळी पडू नये.

अलीकडेच कृषी विभागाने राज्यातील मोठमोठ्या खत कंपन्यांचे सिंगल सुपर फॉस्पेट, विद्राव्य खते, मिश्र खते, सुक्ष्म अन्नद्रव्ये या प्रकारातील नमुने तपासणीसाठी पाठवले होते. अशा २५ कंपन्यांचे एकूण ३६ नमुने अप्रमाणित आढळून आले आहेत. तथापि या कंपन्या वा नमुने बोगस नसून त्यासंदर्भात शेतकऱ्यांनी चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. 

दरम्यान अप्रमाणित, बोगस व भेसळयुक्त निविष्ठा म्हणजे काय? ते कसे ओळखायचे याची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे दिली आहे. शेतकरी बांधवांना त्याचा उपयोग होईल.

अप्रमाणित निविष्ठा कशाला म्हणायचे?
अप्रमाणित बियाणे, खते व कीटकनाशके म्हणजे कायद्यामध्ये नमूद केलेल्या मानकानुसार प्रयोगशाळेत तपासल्यानंतर अशा निविष्ठा त्या मानकाप्रमाणे नसतील तर अशा निविष्ठांना अप्रमाणित निविष्ठा असे म्हणतात. 

बोगस आणि अप्रमाणित निविष्ठांमधील मुख्य फरक
परवानाधारक निविष्ठा जसे बियाणे, खते व कीटकनाशके यांचे नमुने काढल्यानंतर ते प्रयोगशाळेत तपासले जातात. या तपासणीत जर कायद्यामध्ये दिलेल्या दर्जाच्या (मापदंड संदर्भातील तरतुदीतील) प्रमाणापेक्षा कमी मापदंडाचे आढळून आल्यास अशा निविष्ठांना बोगस निविष्ठा न म्हणता त्यांना अप्रमाणित निविष्ठा असे म्हणतात. उत्पादन प्रक्रियेमध्ये काही वेळेस घालून दिलेल्या मापदंडापेक्षा कमी मापदंडाचे उत्पादन होऊ शकते. परंतु कायद्यामध्ये घालून दिलेल्या मापदंडापेक्षा असे उत्पादन फार मोठ्या फरकाने कमी मापदंडाचे नसावे.

भेसळयुक्त निविष्ठा कशाला म्हणतात?
भेसळ युक्त बियाणे खत किंवा कीटकनाशक मध्ये हेतू पुर:सर इतर गोष्टी मिसळून त्याचा दर्जा हा मोठ्या प्रमाणात कमी केला जातो त्याला भेसळयुक्त निविष्ठा असे म्हणतात.

अप्रमाणित बियाणे म्हणजे काय?
अप्रमाणित बियाणे म्हणजे ज्या परवानाधारक बियाण्याची उगवण क्षमता कायद्यामध्ये, विहित मानकांमध्ये घालून दिलेल्या प्रमाणापेक्षा कमी असल्यास असे बियाणे अप्रमाणित बियाणे समजले जाते. जर बियाणे कंपनीने एखाद्या कीड रोगा करता त्यांनी निर्माण केलेला वाण रोगप्रतिकारक आहे असा दावा केला असेल आणि जर केव्हा शेतकऱ्याच्या शेतावर सदरील वाण आर्थिक नुकसान पातळी पेक्षा जास्त रोगाला बळी पडले असेल तर असे बियाणे अप्रमाणित आहे असे समजावे. 

बोगस निविष्ठा म्हणजे काय?
जर लेबलवर, पॅकींगवर एखादे वाण, खत किंवा कीटकनाशक नमूद करून आत दुसऱ्याच वाणाचे/खताचे/कीटकनाशके पाकिटामध्ये पॅक केले असेल तर असे बियाणे/कीटकनाशक/खत बोगस असे समजावे. जर कृषी निविष्ठांच्या बाबतीत त्याच्या वापरानंतरच्या येणाऱ्या उत्पादनाबाबत  अवाजवी दावे केली असती तर अशा निविष्ठा बोगस असा समजण्यात याव्यात.

याशिवाय ज्या निविष्ठा खते बियाणे व कीटकनाशके यांच्या कायद्यानुसार त्या कायद्यामध्ये घालून दिलेल्या अटी नियमानुसार उत्पादन करत नसतील व त्या संदर्भातील परवाना न घेता त्याचे उत्पादन करत असतील तर अशा कृषी निविष्ठा बोगस आहेत असे समजण्यात यावे. 

Web Title: what is difference between substandard and bogus fertilizers, know the reality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.