सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती करत असताना शेतीमध्ये जिवाणूंची संख्या संतुलित ठेवणे खूप गरजेचे असते. त्याचबरोबर शेतीमध्ये येणारे किटाणू, जीवजंतू, पक्षी हेही खूप महत्त्वाचे असतात. मातीमध्ये कोणताही बदल किंवा हालचाल न करणे म्हणजेच नांगरणी न करणे यालाच शेतीमधील परमाकल्चर असे म्हणतात. विनानांगरणी शेती पद्धती अनेक शेतकऱ्यांनी स्विकारली असून त्यातून ते चांगले उत्पन्न घेत आहेत.
जमिनीमध्ये दीर्घकाळ कोणत्याही प्रकारची हालचाल न केल्यामुळे मातीमध्ये असलेल्या सूक्ष्मजीव जंतूंचे काम सतत चालू राहते. मातीमध्ये असलेले सूक्ष्मजीव पालापाचोळा खाऊन पिकांना जीवनसत्वे आणि इतर अन्नद्रव्ये पुरवत असतात. पण ज्यावेळी आपण शेतीमध्ये नांगरणी करतो त्यावेळी हे जिवाणू जमिनीच्या खालच्या थरात जातात आणि वरच्या थरात असलेले त्यांचे काम थांबते. परिणामी पिकाला मिळणारे अन्नद्रव्ये मिळत नाही म्हणून परमाकल्चर पद्धत महत्त्वाची असते.
कसे करायचे परमाकल्चर? परमाकल्चर करण्यासाठी आपल्याला शेतीमध्ये कोणतेही प्रकारचे मशागत करायची नसते. अनेक शेतकरी गादीवाफ्यावर परमाकल्चर बनवतात. त्यासाठी सगळ्यात सुरुवातीला खालच्या थरामध्ये लाकडाचे मोठे ओंडके टाकायचे असतात. लाकडाच्या ओंडक्यानंतर त्याच्या वरच्या थरामध्ये शेतातील पालापाचोळा आणि काडीकचरा टाकायचा. त्यानंतर मातीचा थर देऊन वाफे बनवायचे. वरच्या थरामध्ये आपण गांडूळ किंवा गांडूळ खतही टाकू शकतो.
परमाकल्चर बनवताना टाकलेला पालापाचोळा सहा ते आठ महिन्यात कुजतो. बाकीचा पालापाचोळा किंवा नारळाच्या फांद्यासारखे अवशेष कुजायला तीन ते चार वर्षे जातात. त्याचबरोबर लाकडाचे मोठे ओंडके कुजण्यासाठी दहा ते बारा वर्षे लागतात. त्यामुळे पिकांसाठी टप्प्याटप्प्याने दीर्घकाळासाठी अन्नद्रव्याची उपलब्धता मातीत होत जाते.
माहिती संदर्भ - समीर वाघोले (नैसर्गिक शेती करणारे शेतकरी)