रक्षाबंधन म्हणजे बंधुत्वाचे पोषण करणारा सण. बंधुत्वाचे सुलभ प्रतिनिधित्व करते भावा-बहिणींचे नाते आणि ते नाते साजरे करण्याचे प्रतिक म्हणजे राखी होय. बी म्हणजे म्हणजे सगुण-साकाराचा भला मोठा पसारा वाहणारी चैतन्यमयी, अणुशक्ती होय. अशा बियांच्या राख्या म्हणजे (Artistic Farm Products) होत: कारण देह-प्राण-मनाचे पोषण करणाऱ्या बियांची निर्मिती करणारी व्यवस्था म्हणजे शेती!
शेतीतील कलात्मकतेचे बीज असणारी बीजराखी अंकुरणक्षम, विघटनशील असल्याने पर्यावरणातील कचरा थेट कमी करून कालसुसंगत अशी राखी आहे. खैर, आपटा, शमी, शिरीदा वगैरे वृक्ष बिया; भोपळा, गिलके, कारले, भेंडी, आंबाडी वगैरे भाज्यांच्या बिया; बकुळ, गुलबझी, गुंजा वगैरे फुले-लतांच्या बिया राख्यांचे सौंदर्य वाढवतातच शिवाय मातोशी असणाऱ्या संबंधाला ठळक करतात. राळा, नाचणी, ज्वारी, बाजरी, हिरवी कांगणी, राळा यांच्या म्हणजे मिलेटसच्या राख्या तर थेट शेतीशी असणाऱ्या नात्याला प्रकाशित करतात.
बीजराख्यांच्या निमित्ताने त्या राख्या घडवणाऱ्या व्यक्ती बीजसंकलन, बीज निरीक्षण आणि त्यांची हाताळणी करतात. गावपातळीवर होणाऱ्या बीजराख्यांच्या निर्मितीमुळे कलात्मकतेचा, सृजनशीलतेचा आनंद शेती-शेतकरी संबंधाला स्नेहाचे वंगण करणारा होतो.
समाजाची उभारणीच मुळी शेतीच्या पायावर झालेली आहे. त्यामुळे शेतीचा प्रत्येक अन् प्रत्येक क्षेत्राशी संबंध आहे. 'खाणारी' प्रत्येक व्यक्ती शेतीशी जोडलेली आहे. असे असूनही शेती विषयी असणारे न्यूनत्व स्थर परस्पर संबंधात असंतुलन निर्माण करते, शेतीची अपरिहार्यता, सर्वसमावेशकता, संतुलित विकासाची संधी दुर्लक्षित करते. या परिस्थितीला बदलण्याचे आश्वासन बीजराख्या देतात.
व्यक्ती-पर्यावरण, गाव-शहर, शेती-शेतकरी, शेती-कला, शेती-शेती न करणारे या संबंधातील सख्य सांगणारी, वाढवणारी बीजराखी व्यापक बंधुत्व सांगणार शेतीतील नवअंकुरण आहे.
प्रांजली बोरसेप्रयोगशील शेतकरी, नांद्रे, धुळे