Join us

रब्बी हंगामासाठी खते आणि बियाणांची किती आहे उपलब्धता?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 3:02 PM

खरिपातील पावसाच्या अभावामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर शेतकरी राजा आता रब्बी हंगामासाठी तयार झाला आहे. तर यंदाच्या कमी पावसामुळे रब्बी हंगाम हा शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक असणार आहे.

पुणे : खरिपातील पावसाच्या अभावामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर शेतकरी राजा आता रब्बी हंगामासाठी तयार झाला आहे. तर यंदाच्या कमी पावसामुळे रब्बी हंगाम हा शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक असणार आहे. पाण्याची कमतरता, जनावरांसाठी चाऱ्याचे नियोजन यामुळे रब्बीवरही ताण पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर यंदा रब्बीच्या क्षेत्रामध्ये प्रस्तावित क्षेत्रामध्ये वाढ करण्यात आली आहे. 

यंदाच्या रब्बी हंगामात बियाणांची गरजेएवढी उपलब्धता आहे. पण प्रस्तावित असलेल्या रब्बीच्या क्षेत्रासाठी गरजेपेक्षा ४३ टक्के रासायनिक खत कमी पडणार आहे. त्यामुळे यंदा रासायनिक खतांच्या भावामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तर रब्बीच्या पिकांसाठी उन्हाळी पाण्याची आवर्तने सोडणार नसल्याचेही संकेत कृषीमंत्र्यांनी दिले आहेत. 

तेल बियाण्यांच्या क्षेत्रामध्ये वाढ करण्या करिता करडई, जवस व मोहरी या पिकांखालील क्षेत्रामध्ये वाढ करण्याकरिता पुरेसे प्रमाणात बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचबरोबर योजनांच्या माध्यमातून १ लाख ८४ हजार ०११ क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे. अनुदानित बियाणांच्या माध्यमातून ७ लाख ३६ हजार ५४९ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येणे अपेक्षित आहे. ते रब्बी २०२३ च्या क्षेत्राच्या तुलनेत १३ टक्के आहे.

ज्वारीच्या २० गुंठे क्षेत्रासाठी २ किलो याप्रमाणे ३ लाख ३० हजार मिनीकीट शेतकऱ्यांना पुरवण्यात येणार असून या माध्यमातून ६६ हजार हेक्टर क्षेत्र रब्बी ज्वारी करीता, तर मसुर पिकाच्या २० गुंठे क्षेत्राकरीता ८ किलो याप्रमाणे २५ हजार मिनीकीट पुरविण्यात येणार असून या माध्यमातून ५ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येणे अपेक्षित आहे.

रब्बी हंगाम आढावा बैठकीत रब्बीसाठी सुमारे ५८.७६ लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. रब्बी क्षेत्राकरिता साधारण ९ लाख ५१ हजार १७० क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. या तुलनेत राज्यात सध्याच्या घडीला ११ लाख १० हजार १५८ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. तसेच रब्बी हंगामाकरीता आज रोजी १६.७४ लाख मे. टन रासायनिक खतांचा साठा उपलब्ध आहे. रब्बी हंगाम २०२३ करीता २९.६० लाख मे. टन खत आवंटन केंद्र सरकारने मंजुर केलेले आहे. 

रब्बी हंगामाकरिता राज्यात बियाणांची किती आहे उपलब्धता?

 

 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीकृषी विज्ञान केंद्र