महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे डोंगरपायथ्याला असलेले किंवा दुर्गम भागातील शेतकरी बांबूची शेती करतात. अजूनही बांबूला म्हणावे तेवढे व्यावसायिक स्वरूप आले नाही तरीही कोकणातील काही भाग, पश्चिम महाराष्ट्रातील भोर, वेल्हा आणि पूर्व महाराष्ट्र म्हणजेच विदर्भातील काही भागांत बांबूचे उत्पादन घेतले जाते. सरकारकडूनही आता बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. बांबूमध्ये आता कलर कोड पद्धत नव्याने रूजू होत आहे.
दरम्यान, बांबू मार्केटमध्ये विक्रीसाठी गेल्यावर तो बांबू अपरिपक्व असल्याचं सांगून शेतकऱ्यांना कमी दर दिला जातो. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. कारण बांबू वाळल्यानंतर आपण तो अपरिपक्व आहे की परिपक्व आहे हे रंगावरून ओळखू शकत नाही. पण अपरिपक्व बांबूवर चिरा पडल्यामुळे ते वाया जातात.
अपरिपक्व बांबू ओळखण्यासाठी आणि बांबूचे वय कळण्यासाठी बांबूला रंग देण्याची पद्धत आता महाराष्ट्रातही रुजू लागली असून यामुळे बांबूचे वय मोजण्यास मदत होते. त्याचबरोबर काढणीवेळी अपरिपक्व बांबू काढले जात नाहीत. म्हणून बाजारातही अपरिपक्व बांबू विक्रीसाठी जात नाही.
कशी केली जाते कलर कोडिंग?
एका बेटामध्ये साधारण दहा बारा किंवा त्यापेक्षा जास्त बांबू असू शकतात. पण हे बांबू एकाच वयाचे नसतात. यातील काही एक तर काही सहा महिन्याचे असतात. या बांबूच्या वयानुसार त्याला रंग दिले जातात. पांढरा, लाल, निळा या रंगाचा वापर केला जातो. यामध्ये ठराविक वयोगटातील बांबूंना एकसारखे रंग दिले जातात. त्यामुळे बांबूचे वय ओळखता येते.
महाराष्ट्रात ही पद्धत अजून प्रचलित नसून पहिल्यांदाच कलर कोडिंगचा हा प्रयोग पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील अनुराधा काशिद या महिला शेतकऱ्याने केला आहे. बांबूला व्यवसायिक स्वरूप हळूहळू येत असून अनेक शेतकरी कलर कोडिंगचा वापर करायला सुरूवात करत आहेत.