Lokmat Agro >शेतशिवार > किडींची आर्थिक नुकसान पातळी म्हणजे काय? कपाशीतील कीड व्यवस्थापन कसे कराल

किडींची आर्थिक नुकसान पातळी म्हणजे काय? कपाशीतील कीड व्यवस्थापन कसे कराल

What is the Economic Damage Level of Pests? How to manage pests in cotton | किडींची आर्थिक नुकसान पातळी म्हणजे काय? कपाशीतील कीड व्यवस्थापन कसे कराल

किडींची आर्थिक नुकसान पातळी म्हणजे काय? कपाशीतील कीड व्यवस्थापन कसे कराल

बीटी कपाशीमध्ये रसशोषक किडी व शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव फुलांमध्ये डोमकळीच्या स्वरुपात दिसून येत आहे. त्यांच्या व्यवस्थापन उपाययोजना आखण्यापुर्वी आर्थिक नुकसानीची पातळी पाहूनच निर्णय घ्यावा.

बीटी कपाशीमध्ये रसशोषक किडी व शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव फुलांमध्ये डोमकळीच्या स्वरुपात दिसून येत आहे. त्यांच्या व्यवस्थापन उपाययोजना आखण्यापुर्वी आर्थिक नुकसानीची पातळी पाहूनच निर्णय घ्यावा.

शेअर :

Join us
Join usNext

सध्या कपाशीचे पिक पाते, फुले व बोंड लागण्याच्या स्थितीत आहे. बीटी कपाशीमध्ये रसशोषक किडी व शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव फुलांमध्ये डोमकळीच्या स्वरुपात दिसून येत आहे. त्यांच्या व्यवस्थापन उपाययोजना आखण्यापुर्वी आर्थिक नुकसानीची पातळी पाहूनच निर्णय घ्यावा.

मावा
नुकसानीचा प्रकार: रंगाने पिवळसर ते गडद हिरवे किंवा काळे १ ते २ मिमी लांब असतात. पिल्ले व प्रौढ मावा पानाचा खालचा बाजूने आणि कोवळया शेंड्यांवर समूहाने राहून त्यातील रस शोषण करतात. अशी पाने आकसतात व मुरगळतात, त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. मावा शरीरातून चिकट गोड द्रव बाहेर टाकतो, त्यामुळे काळी बुरशी वाढून पानावर काळा थर जमा होतो. यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत बाधा येवून झाडाच्या वाढीवर अनिष्ठ परिणाम होतो.

तुडतुडे
नुकसानीचा प्रकार: प्रौढ तुडतुडे आणि पिल्ले पानांच्या खालच्या बाजूने राहून त्यातील रस शोषण करतात. अशी पाने प्रथम कडेने पिवळसर होऊन नंतर तपकिरी रंगाची होतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण पाने लाल तांबडी होऊन त्यांच्या कडा मुरगळतात, परिणामी झाडाची वाढ खुंटते.

फुलकिडे
नुकसानीचा प्रकार: प्रौढ फुलकिडे आणि पिल्ले कापसाच्या पानामागील भाग खरवडून त्यातून निघणारा रस शोषण करतात. प्रादुर्भावग्रस्त भागातील पेशी शुष्क होतात व प्रथम तो भाग पांढुरका आणि नंतर तपकिरी होतो. त्यामुळे पाने, फुले व कळ्या आकसतात. झाडाची वाढ खुंटते.

पांढरी माशी
नुकसानीचा प्रकार: पिल्ले तसेच प्रौढ पानाच्या खालच्या बाजूने राहून रस शोषण करतात, अशी पाने कोमेजतात. प्रादुर्भाव जास्त असल्यास पाने लालसर ठिसूळ होवून शेवटी वाळतात. याशिवाय पिल्ले आपल्या शरीरातून गोड चिकट द्रव बाहेर टाकतात व त्यावर काळी बुरशी वाढते. परिणामी पाने व झाड चिकट व काळसर होते आणि झाडाची वाढ खुंटते.

रसशोषक किडींचे एकात्मिक व्यवस्थापन
रासायनिक कीटकनाशकाचा प्रथम वापर शक्यतो टाळावा. कारण त्यामुळे क्रायसोपर्ला, क्रिप्टोलिमस, ढालकिडी, सिरफीड माशी आदि मित्रकीटकांचा नाश होतो.

  • व्हर्टीसिलियम लेकॅनी ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
  • ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अॅझाडीरेक्टीन १५०० पीपीएम तीव्रतेचे २.५ लिटर प्रति १००० लिटर पाणी (२५ मिली प्रति १० लिटर पाणी) प्रति हेक्टरी या प्रमाणात फवारणी करावी.
  • किडीची आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर असिटामिप्रिड २५ एसपी ४-६ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी किंवा फ्लोनिकामीड ५० डब्ल्युजी ४-६ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
  • कोणत्याही सिंथेटिक पायरेथ्रॉईड गटामधील कीटकनाशकाचा किंवा इतर कीटकनाशकांच्या मिश्रणांचा वापर टाळावा.


शेंदरी बोंडअळीमुळे कपाशीचे नुकसान
शेंदरी बोंडअळी कळ्या, फुले किंवा बोंडे यांना बारीक छिद्र करून आत शिरते. प्रादुर्भाव झालेल्या फुलाच्या अर्धवट उमललेल्या पाकळ्या एकमेकात पिळवटून गुलाबाच्या कळी (डोमकळी) सारख्या दिसतात. बोंडामध्ये हि अळी शिरल्यानंतर तिची विष्ठा व बोंडाचे बारीक कण यांच्या सहाय्याने ती छिद्र बंद करते. बोंडावर काळे ठिपके दिसतात त्यामुळे बोंडावर या अळीचा प्रादुर्भाव वरवर निरीक्षण केल्यास दिसून येत नाही. अळ्या छिद्र करून सरकी खातात.

शेंदरी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन

  • बोंडअळीची अंडी पिकात दिसू लागताच ट्रायकोग्रामा बॅक्टेरी या परोपजीवी किडींची कीटकाची अंडी १.५ लाख प्रति हेक्टरी या प्रमाणात शेतात सोडावीत. अंडी ४० व ६० व्या दिवशी दोन वेळा सोडावीत.
  • कामगंध सापळे (पेक्टीनो ल्युर) (Pectino Lure) हेक्टरी ५ या प्रमाणे शेतात लावून दररोज बोंडअळीचे नर पतंग मोजावेत. त्यामुळे किडींची आर्थिक नुकसान पातळी लक्षात येते. कामगंध सापळे (प्रति हेक्टरी २०) या प्रमाणे शेतात वापर करून शेंदरी बोंडअळीचे नर पतंग मोठ्या प्रमाणात पकडून नष्ट करावीत. तसेच सौर उर्जेवर चालणारे सापळे व प्रकाश सापळ्यांचा सुद्धा उपयोग करावा.
  • पक्ष्यांना बसण्यासाठी शेतात (प्रति हेक्टरी २०) पक्षीथांबे लावावेत.
  • लिंबोळी अर्काची (५ टक्के) किंवा अॅझाडीरेक्टीन १५०० पीपीएम २५ मिली प्रति १० लिटर पाणी २.५ लिटर प्रति १००० लिटर पाणी प्रति हेक्टर या प्रमाणात प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
  • आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर क्विनॉलफॉस २५ ईसी २० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी २० ग्रॅम प्रति १० लि. या प्रमाणात फवारणी करावी.


आर्थिक नुकसानीची पातळी (ETL)

किडी

आर्थिक नुकसानीची पातळी (ETL)

मावा

१५ ते २० टक्के प्रादुर्भाव ग्रस्त झाडे किंवा १० मावा प्रति पान

तुडतुडे

२ पिल्ले किंवा प्रौढ प्रति पान

फुलकिडे

१० पिल्ले किंवा प्रौढ प्रति पान

पांढरी माशी

२० पिल्ले किंवा ४ ते १० प्रौढ माशी प्रति पान

हिरवी बोंडअळी

१ अंडी किंवा १ अळी प्रति झाड

शेंदरी बोंडअळी

१० टक्के प्रादुर्भाव ग्रस्त (चाफे, फुले, बोंडे) ८ पतंग/सापळा प्रति दिवस किंवा १ अळी/१० फुले किंवा १ अळी/१० बोंडे


कापूस संशोधन केंद्र, नांदेड
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

 

Web Title: What is the Economic Damage Level of Pests? How to manage pests in cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.