Join us

कुठे घाटेआळी तर कुठे जनावरांचा धुडगुस, हरभरा पिकाची काय स्थिती?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 12:00 PM

घाटेआळी, वन्यप्राण्यांचा धोका तर कुठे अवकाळी पावसामुळे पीक बहरले.

मराठवाड्यात सध्या अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणाने हरभऱ्यावर घाटेआळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तर काही ठिकाणी वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने हरभरा पिकाचे नुकसान झाले आहे. कोरडवाहू पट्ट्यात झालेल्या अवेळी पावसाने हरभरापीक जोमात वाढत असल्याचे चित्र आहे. मराठवाड्यात कुठे काय परिस्थिती आहे?

वन्य प्राणी करताहेत हरभरा फस्त

पेरणी होताच अवकाळीचा मारा, मर रोगाची लागण, घाटेआळीचा प्रादुर्भाव अशा एक ना अनेक संकटातून कसाबसा वाचलेला हरभरा आता वन्यप्राणी फस्त करीत आहेत. त्यामुळे सेनगाव तालुक्यातील सवना भागातील शेतकरी त्रस्त झाला आहे. सवना, सवना तांडा, ब्राह्मणवाडा,वायचाळ पिंपरी, सुरजखेडा भागात  हरिण, रानडुकर,वानरे, मोकाट जनावरांचाही उपद्रव वाढला आहे. हे प्राणी पिके फस्त करीत असल्याने रात्रं दिवस राखण करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. वन विभागाने लक्ष देऊन या प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.

हेही वाचा- वन्यप्राण्यांमुळे शेतीचं नुकसान झालंय? २० लाखांपर्यंत मिळते मदत..! कशी?

घाटेअळीचा प्रादुर्भाव

सध्या हरभऱ्याला घाटे धरत आहेत. अशा परिस्थितीत घाटेआळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.किडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना महागडी कीटकनाशके फवारावी लागत आहेत.   

संबंधित- हरभरा पिकावरील घाटेअळीचा वेळीच करा बंदोबस्त

कोरडवाहू भागात हरभरा बहरला

सिरसाळा परिसरातील कोरडवाहू पट्टयात झालेल्या अवकाळी पावसाने परिसरातील गहू, हरभरा, ज्वारी पिके उगवून आल्याने शेतशिवार बहरले आहे. 

टॅग्स :हरभरापीकमराठवाडाहवामानपाऊस