औंढा तालुक्यातील जवळाबाजार गटातील ऊस उत्पादकांचा ऊस पूर्णा सहकारी कारखाना घेऊन जात नाही. त्यामुळे ऊस कोणत्या कारखान्यांना द्यावा, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. शेतकरी सद्य:स्थितीत दोन्ही कारखान्यांवर ऊस घ्या म्हणून चकरा मारत आहेत. परंतु, कोणताही अधिकारी दखत घेत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
जवळाबाजारसह परिसरातील करंजाळा, गुंडा, कळंबा, बोरी (सावंत), आजरसोंडा, तपोवन, राजांळा आदी गावांमध्ये उसाचे क्षेत्र मोठे आहे. सदर सर्व गावांमध्ये पूर्णा कारखान्याच्या टोळ्या नाहीत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ऊस न्यावा म्हणून करावी लागते विनंती
'पूर्णा' व जवळाबाजारजवळ एक खाजगी साखर कारखानासुद्धा आहे. परंतु, तोही शेतकऱ्यांचा ऊस घेऊन जात नाही. त्यामुळे शेतकरी दोन्ही कारखान्यांवर ऊस नेण्यासाठी चकरा मारत आहेत.परंतु, दोन्ही कारखाना प्रशासन शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांना आपला ऊस गूळ कारखान्यांना द्यावा लागत आहे. सध्या कारखाने ऊस नेण्यास कानाडोळा करीत आहेत. परंतु, गूळ कारखाने मात्र स्वखुशीने ऊस घेण्यास तयार आहेत.
कारखाना प्रशासन ऊस उत्पादकांची केंव्हा घेणार दखल?
तीन वर्षे कारस्वान्याला ऊस दिला गेला तर त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना निवडणुकीत उभे राहता येते. परंतु, तीन वर्षे ऊस दिला नाही तर निवडणुकीत उभे राहण्यापासून वंचित राहण्याची वेळ येते. हा प्रकार अनेक शेतकऱ्यांना गत निवडणुकीत अनुभवास आला आहे. तेव्हा सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस दोन्ही कारखान्यांनी घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.