Join us

पोळ्यानिमित्त बाजारपेठ काय साहित्य आले विक्रीला? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 6:38 PM

पोळ्यानिमित्त बाजारपेठ काय साहित्य आले विक्रीला. त्याची सविस्तर माहिती वाचा.

शेतकऱ्यांचा सण पोळा अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला आहे.  २ सप्टेंबर  रोजी असल्याने बाजारात साहित्य खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. बैलांना सजविण्याच्या साहित्याच्या दरात १५ टक्के वाढ झाल्याने बळीराजाला आर्थिक फटका बसत आहे.

शेतकऱ्यांचा सोबती असलेल्या सर्जा-राजाचा सण २ सप्टेंबरला साजरा केला जाणार आहे. त्यामुळे वर्षभर शेतीच्या कामासाठी कष्ट करणाऱ्या बैलांना सजविण्यासाठी फुलंब्री तालुक्यातील बाबरा, सिल्लोड तालुक्यातील केळगाव, लिहाखेडी, आदी ठिकाणच्या बाजारात मोठ्या प्रमाणात साहित्य विक्रीसाठी आले आहे.

बाबरा येथील बुधवारच्या आठवडा बाजारातही हे साहित्य खरेदीसाठी शेतकरी गर्दी करताना दिसून आले. यात गोंदे मोख्या मंगरू माळा कासरे, चाबुक, मोत्याच्या माळा, फुगे, चमकी, आदी साहित्याचा समावेश आहे. 

तसेच बाजारात मोरकी १३५ रुपये, कासर १६०, वेसण ६० रुपये, सर ११० ते २१८ रुपये, कवडी माळ २१० ते २७० रुपये मणीमाळ ११० ते १४० रुपये, झूल १५५० ते १७२० रुपये, बाशिंग १६० ते २१० रुपये, घुंगरू पट्टा ७०० रुपयांना विक्री केली जात होती. 

विशेष म्हणजे प्रत्येक घरात पूजा करण्यासाठी मातीचे बैलही बाजारात विक्रीसाठी आले आहेत. बाजारात ही बैलजोडी ५० ते १०० रुपयांना विकली जात होती.  या साहित्याच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी १५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

पाऊस चांगला झाल्याने उत्साह

* सध्या सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने पिकांची स्थिती चांगली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा खरेदीसाठी उत्साह दिसून येत आहे.

* परिणामी बैल सजावटीच्या साहित्य दरात वाढ झाली असली तरी शेतकरी वर्षभर आपल्याला खंबीरपणे साथ देणाऱ्या लाडक्या सर्जा-राजाचा सण साजरा करण्यासाठी सरसावले आहेत.

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड