देवगड तालुक्यामध्ये पडलेल्या पावसामुळे आंबा व काजू फळबागांची पाहणी कुणकेश्वर, कातवण, वाडा, हुर्शी, पडेल, नाडण इत्यादी गावांमध्ये कृषी विभागाकडून प्रत्यक्ष बागेत जाऊन पाहणी करण्यात आली. या पाहणीमध्ये तालुका कृषी अधिकारी कैलास ढेपे व शास्त्रज्ञ डॉ. विजय दामोदर, उद्यानविद्यावेत्ता, आंबा संशोधन उपकेंद्र, रामेश्वर आणि कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचेमार्फत पाहणी करण्यात आली. तसेच बागायतदारांना आंबा फळ पिकांचे संरक्षण करण्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या पाहणीत ५ मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे आंबा व काजू पिकासाठी पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेच्या प्रमाणकेनुसार पीक संरक्षित रक्कम मिळण्यास फळ पिकविमा सहभागी शेतकरी पात्र असल्याचा निकष काढण्यात आला. विविध ठिकाणी पाहणी करीत असताना आंब्याच्या फळबागा या वेगवेगळ्या अवस्थेत आढळून आल्या आहेत, जसे की काही फळबागांना अजून मोहर फुटलेला नाही, काही फळबागांना मोहर फुटलेला आहे, ज्या बागांचा मोहर परिपक्वतेच्या अवस्थेत आहे किंवा ज्या बागांना पहिल्या टप्प्यात मोहर आला होता अशा बागा फळधारणेच्या अवस्थेत आहे. फळे हे वाटाणा, लिंबू व अंडाकृती आकारमानात आढळलेल्या आहेत. फुलकीडे आणि करपा रोगांसाठी डॉ. बा. सा. कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केल्यानुसार पुढीलप्रमाणे फवारणी करून आंबा फळपिकांचे संरक्षण करण्याबाबतच्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
अधिक वाचा: आंबा फळ पिकातील मोहोराचे संरक्षण कसे कराल?
ज्या शेतकऱ्यांनी पाऊस गेल्यानंतर करपा रोगाच्या नियंत्रणासाठी फवारणी केली नसल्यास त्यांनी त्वरित करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझीम १२ टक्के मॅन्कोझेब ६३ टक्के १० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंबा पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास २.५ मिलीलिटर स्पिनोसॅड ४५ टक्के प्रवाही प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास दुसरी फवारणी थायोमिथोक्झाम २५ टक्के दोन ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात करावी आदी सूचना करण्यात आल्या.