पुणे जिल्ह्यातील मानवाच्या अधिवासातील बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पाळीव प्राण्यांवर आणि जनावरांवर होणारे हल्लेसुद्धा वाढले आहेत. अनेक ठिकाणी मानवांवरही हल्ले केल्याच्या घटना घडल्या असून या परिसरामध्ये दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर आढळून येताना दिसत आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
दरम्यान, मागच्या २ ते ३ वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या परिसरामध्ये बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. आळेफाटा येथील आळे गावातील ३ वर्षांच्या मुलाला बिबट्याने ठार केल्यानंतर या ठिकाणी वन विभागाकडून पिंजरे लावण्यात आले होते. तर नारायणगाव येथील वारूळवाडी येथे सुद्धा कुत्रे, शेळ्या आणि गायींचे वासरे बिबट्याने ठार केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून शेतातील कामे करावे लागत आहेत. तर वनविभागाकडून बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी वन्यजीव सप्ताहाच्या माध्यमातून बिबट जनजागृती केली जाते.
का वाढली बिबट्याची संख्या?
मानवाने दिवसेंदिवस जंगलावर अतिक्रमण केल्यामुळे जंगली प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहे. परिणामी त्यांना मानवी वस्तीत प्रवेश करून आपले भक्ष्य शोधावे लागत आहे. तर ज्या मादीचे प्रजनन उसाच्या शेतात झालेले असते अशा मादींच्या पिल्लांची वाढही मानवी वस्तीतच झालेली असते. त्यामुळे ही पिल्ले मोठी झाल्यावर याच परिसरात राहून आपला उदर्निर्वाह भागवतात. दरम्यान, बिबट्या, वाघ, सिंह यांसारख्या प्राण्यांची शिकार किंवा त्यांना पकडण्यास मनाई असल्यामुळे त्यांची संख्या वाढत आहे.
बिबट्या माणसांवर हल्ला करतो का?
बिबट्या हा मांसाहारी प्राणी असून त्याच्या उंचीपेक्षा कमी उंचीच्या प्राण्यावर हल्ला करतो. मोठ्या गायी, म्हशी किंवा प्राण्यांवर बिबट्या हल्ला करत नाही. तर शेळ्या, मेंढ्या, पिल्ले, कुत्रे किंवा जंगलातील हरणे, ससे तर अन्नाची उपलब्धता झाली नाही तर उंदीर, घुशीसारख्या प्राण्यांवरही तो हल्ला करतो. तो सहसा माणसांवर हल्ला करत नाही. पण लहान मुलांची उंची कमी असल्यामुळे त्यांच्यावर हल्ला करू शकतो असं तज्ज्ञ सांगतात.
बिबट्यापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी?
- जर शेतकरी शेतात जात असतील तर त्यांनी हातात काठी, कोयता, कुऱ्हाड किंवा एखादे हत्यार ठेवले पाहिजे.
- उसाच्या किंवा उंच पिकाच्या शेतातून जात असताना मोठ्याने आवाज करत किंवा गाणे गात चालले पाहिजे. जेणेकरून बिबट्याला कुणीतरी आल्याची चाहूल लागल्यानंतर तो पळून जाईल.
- रात्री अपरात्री शेतात जात असताना बॅटरी सोबत असावी. जेणेकरून बिबट्या उजेडापासून लांब जाईल.
- शेतात वाकून काम करणे टााळले पाहिजे. वाकून काम करत असलेल्या व्यक्तीवर हल्ला करण्याची शक्यता जास्त असते.
- ज्या ठिकाणी जनावरे बांधले जातात त्या ठिकाणी बंदिस्त गोठा आणि लाईटची व्यवस्था पाहिजे. बिबट्या अंधारात शिकार करतो त्यामुळे उजेड असला तर बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता कमी असते.
- बिबट्याची चाहूल लागताच कुत्रे भुंकतात त्यामुळे बिबट्यापासून संरक्षण होऊ शकते, पण झोपलेल्या कुत्र्यावही बिबट्या हल्ला करतो.
- बिबट्याचा वावर आढळल्यास वनविभागाला संपर्क साधून माहिती द्यावी.