Join us

Hitech Ration Card : काय सांगताय हायटेक रेशनकार्ड; कसे मिळणार वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 12:28 PM

स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे विविध धान्य आणि योजनेसाठी रेशन कार्ड आवश्यक असते. ते रेशन कार्ड आता ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. कसे ते वाचा सविस्तर (Hitech Ration Card)

स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे विविध धान्य आणि योजनांमधील किट मिळविण्यासाठी रेशन दुकानात ग्राहकांची गर्दी वाढली आहे. यासोबतच अनेक दिवसांपासून वापरात नसलेले रेशनकार्ड पुन्हा वापरात आले आहे. तसेच अनेकांचे रेशनकार्ड हरविल्याने अशा रेशनकार्ड धारकांनी थेट तहसीलमध्ये धाव घेतली. अशा रेशनकार्ड धारकांना आता ई- रेशनकार्ड दिले जात आहे.

गेल्या वर्षभरापासून ई-रेशनकार्ड वाटपाची मोहीम सुरू आहे. ज्यात नवीन ग्राहकांनी रेशनकार्डची मागणी केली. त्या सर्व रेशनकार्ड धारकांना ई- रेशनकार्ड दिले जात आहे. यासोबतच ज्या रेशनकार्ड धारकांचे रेशनकार्ड हरविले अशा रेशनकार्ड धारकांनाही ई-रेशनकार्ड दिले जात आहे.

हे रेशनकार्ड वापरण्यासाठी सोपे आहे. स्मार्टफोनवर ते सहज उपलब्ध होते. याशिवाय सत्यप्रत लागली तर त्यात प्रिंटवर सही आणि शिक्का करून दिला जातो. यामुळे रेशनकार्ड जोडायचे काम पडले तर अशा स्वरूपाचे कार्ड वापरता येते. यामुळे ई- रेशनकार्ड वापर करणे सर्वांसाठी सोयीचे ठरणार आहे.

६,१५,००० रेशन कार्डधारक जिल्ह्यात

यवतमाळ जिल्ह्यात विविध घटकातील योजनांमध्ये मोडले जाणारे सहा लाख १५ हजार रेशनकार्ड धारक कुटुंब आहेत. अंत्योदय, एपीएल शेतकरी, आणि शुभ्र कार्डधारक लाभार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. प्रत्येक कार्डवर विविध योजनेतून धान्य दिले जाते.

ई-रेशनकार्ड धारकांची संख्या वाढणार

नवीन रेशनकार्ड धारकांना यापुढे पुस्तक मिळणार नाही. तर त्या जागेवर ई-रेशनकार्ड दिले जात आहे. अशा रेशनकार्ड धारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

रेशनकार्ड हरवले तर करा ऑनलाइन अर्ज

रेशनकार्ड हरविल्यास ग्राहकांना अशा कार्डसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करता येतो. यावरून ऑनलाइन स्वरूपाचे रेशनकार्ड त्यांना उपलब्ध करून दिले जाते.

ई रेशनकार्ड कोणाला मिळणार?

ज्या रेशनकार्ड धारकांचे कार्ड हरविले आहे. अशा रेशनकार्ड धारकांना तरी ऑनलाइन स्वरूपातील तक्रार दाखल करावी लागते. यानंतर त्यांना ऑनलाइन स्वरूपाचे नवे रेशनकार्ड दिले जाते. नवीन रेशनकार्डची मागणी करणाऱ्या ग्राहकांना ई-रेशनकार्ड देण्याची सुविधा उपलब्ध करूनदेण्यात आली आहे.

जिल्ह्यात वर्षभरापासून ई-रेशनकार्ड वितरणाची मोहीम सुरू आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसाद आहे. ग्राहकांना अशा स्वरूपाचे रेशनकार्ड वापरणे सोपे आणि सहज आहे. पुढील काळात अशाच स्वरूपाचे रेशनकार्ड दिले जाणार आहे.- सुधाकर पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी, यवतमाळ

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीग्राम पंचायत