आधुनिक रोगनाशके व किटकनाशके इतर विषारी आहेत की, त्यांचा योग्य रितीने वापर न केल्यास माणूस व इतर पाळीव जनावरे यांच्या जीवीतास धोका पोहोचतो. त्यासाठी अशा औषधांपासून सावधगिरी बाळगण्याच्या दृष्टीने पुढील सूचना काळजीपूर्वक पाळाव्यात.
- सर्व विषारी औषधांच्या बाटल्यांवर अगर डब्यांवर मोठ्या अक्षरामध्ये त्या औषधाचे नाव घालून ती औषधे थंड व कोरड्या जागी कुलुपामध्ये सुरक्षित ठेवावीत. ती मुलाबाळाच्या हाती लागणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
- किटकनाशक व रोगनाशक औषधांच्य पिशव्या काळजीपूर्वक फोडाव्यात. तसेच किटकनाशक औषधे असलेल्या बाटल्यांची झाकणे सावकाश उघडावीत.
- बऱ्याच वेळा पिकावर फवारण्याचे औषध आजूबाजूच्या गवतावर पडण्याचा संभव असतो. म्हणून त्यापासून जनावरांना धोका पोहोचणार नाही, याची दक्षता घ्यावी.
- खाद्यपदार्थ, इतर औषधे व लहान मुले यांच्याशी औषधांचा संपर्क येऊ देऊ नये.
- औषध मारण्याच्या कामासाठी हातापायांवर जखम झालेल्या माणसाची निवड करु नये कारण जखमेवाटे या विषारी औषधांचा शरीरामध्ये शिरकाव होऊन धोका पोहोचण्याचा संभव असतो.
- फवारण्याचे मिश्रण किंवा उंदरांसाठी विषारी गोळ्या तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी मातीची भांडी, रिकामे डबे अगर बाटल्या घरगुती कामासाठी (उदा.गोडतेल, पाणी इत्यादीसाठी) न वापरता जमिनीमध्ये खोल पुराव्यात व धातुची भांडी साबण, सोडा व माती यांनी स्वच्छ धुवून घ्यावीत.
- डब्यातून अगर बाटलीतून औषध काढतांना त्यात नळी घालून तोंडाने वर ओढू नये. शक्यतो हातात रबरी हातमोजे घालावेत.
- औषधांचे मिश्रण तयार करण्याचे अथवा फवारण्याचे काम चालू असतांना खाणे, पिणे अगर धूम्रपान करु नये. नाहीतर औषध पोटात जाण्याचा संभव असतो. तसेच औषध फवारण्याच्या नळीतील घाण अगर कचरा फुंकून साफ न करता तो तारेने साफ करावा.
- किटकनाशक औषध तयार करतांना व फवारतांना जरुर ते शरीर संरक्षक कपडे व उपकरणे वापरावीत.
- शक्यतो पिकांवर फवारण्याचे मिश्रण हाताने न ढवळता ते ढवळण्यासाठी लागडी काठी वगैरे वापरावी.
- भाजीपाला अगर जनावरांचा (कोबी, लसूण व गवत) वगैरे तत्सम पिकांवर औषध फवारल्यानंतर त्या भाज्या अथवा चारा किमान १५ दिवस तरी खाण्यामध्ये येऊ नये, त्याचप्रमाणे स्वच्छ धुवून घ्याव्यात.
- शक्यतो औषध फवारण्याचे काम एकाच माणसाकडून सतत करुन न घेता पाळीपाळीने करुन घ्यावे. त्याचप्रमाणे दुपारच्या वेळी हे काम न करता सकाळी व संध्याकाळी करावे.
- औषध फवारणी वाऱ्याच्य दिशेने करावी म्हणजे हे औषध पिकांवर चांगले पसरते. तसेच नाका-तोंडावाटे हे औषध पोटात जाण्याचा संभव टळतो.
- फवारण्याचे काम पूर्ण झाल्यावर अंगावरील कपडे तसेच सर्व अंग साबणाने व पाण्याने स्वच्छ धुवावे.
- पेरणीनंतर किटकनाशक व बुरशीनाशकाची बिजप्रक्रीया केलेले बियाणे शिल्लक राहील्यास खाण्याकरीता वापरु नये. ते जाळून अथवा जमिनीत पुरुन टाकावे.
साधनांचा वापर करणाऱ्या व्यक्तीने लक्षात घ्यावयाच्या गोष्टी
- औषध फवारणी किंवा धुरळणी झाल्यावर साधन स्वच्छ करुन तपासणी करावी. साधनातील औषध पूर्णपणे निघून गेले आहे, याची खात्री करावी, कारण शिल्लक राहिलेल्या औषधापासून विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.
- शेतावर औषध फवारण्यासाठी जात असतांना साधनांचे सुटे भाग आणि हत्यारे बरोबर घ्यावीत म्हणजे औषधाचा वापर चालू असतांना साधनामध्ये काही दोष निर्माण झाल्यास त्याची दुरुस्ती करता येणे शक्य होईल.
- सामान्यत: वॉशर्स, नोझल, रबरी पाईप्सच्या क्लिप्स, स्पार्क प्लग्ज, स्क्रू ड्रायव्हर्स, पाने इत्यादी बरोबर घ्यावेत.
- जेव्हा अनेक साधने एकाचवेळी शेतात वापरली जातात, त्यावेळेला एक-दोन जादा साधने शेतावर नेणे आवश्यक ठरते. असे केल्याने एखादे साधन बंद पडल्यास वेळेचा अपव्यय होत नाही.
- औषध फवारण्यासाठी गळक्या साधनांचा वापर करु नये. अशा साधनांमुळे वापरणाऱ्याला इजा होऊ शकते. तसेच पिकालाही धोका संभवतो.
किटकशास्त्र विभाग,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी