Join us

बियाणे, खते खरेदी करताना फसवणूक झाली तर काय कराल?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 9:22 AM

निसर्गाच्या भरोशावर शेती करणाऱ्या शेतकऱ्याला कुठल्याही पद्धतीची फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी विभाग सज्ज असतो. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करताना फसवणूक झाल्याची शेतकऱ्यांची तक्रार असते.

भारत हा कृषिप्रधान देश आहे. या देशातील शेती अद्याप निसर्गाच्या भरवशावर केली जाते. काही प्रमाणात यात आधुनिकता आणि कष्ट कमी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, मोठ्या प्रमाणावर शेतकरी अजूनही कष्टानेच आपली शेती कसत असल्याचे पाहायला मिळते.

निसर्गाच्या भरोशावर शेती करणाऱ्या शेतकऱ्याला कुठल्याही पद्धतीची फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी विभाग सज्ज असतो. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करताना फसवणूक झाल्याची शेतकऱ्यांची तक्रार असते.

अशी फसवणूक झाल्यास शेतकऱ्यांना तक्रार निवारण समिती, कृषी विभाग किंवा भरारी पथकांकडे आपली तक्रार नोंदविता येणार आहे. पेरणीच्या ऐन हंगामात धावपळ होऊ नये म्हणून खते, बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

यंदा एप्रिल व मे महिन्यात अवकाळी पाऊस पडल्याने शेती मशागतीची कामे वेळेत झाली. उन्हाळी मूग, सोयाबीन, भुईमूग यासह अन्य पिके निघाल्यानंतर शेती मशागतीच्या कामाला शेतकऱ्यांनी गती दिली. खरीप हंगाम असल्याने खते, बियाणांसंदर्भात शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना कृषी विभागाला देण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्यावर कठोर कारवाईचीही तरतूद असते. बियाणे, खते किंवा कीटकनाशकांबाबत तक्रार असेल तर पक्के बिल, तक्रारीचे स्वरूप ही माहिती तक्रार निवारण समिती किंवा कृषी अधिकारी भरारी पथकाकडे द्यावी लागते.

खते, बियाणे, कीटकनाशके दर्जेदार नाहीत, शासकीय दरापेक्षा अधिक किंमत आकारण्यात येते, घेतलेले बियाणे उगवले नाहीत.. अशा स्वरुपाच्या तक्रारी शेतकऱ्यांना करता येतात. शेती निविष्ठांबाबत तक्रार असल्यास सर्व तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी, भरारी पथक मोहीम अधिकारी यांच्याशी शेतकऱ्यांना थेट संपर्क साधता येतो.

प्रगती जाधव-पाटीलउपसंपादक, लोकमत, सातारा

अधिक वाचा: Coconut Cultivation नारळ लावताय; लागवडीसाठी कसा भराल खड्डा

टॅग्स :शेतकरीपीकपेरणीखतेसरकारशेती