आंबा आणि केळीच्या पिकांना फळधारणा झाल्याने उत्पन्नाची आर्थिक गणिते मांडणाऱ्या एक हजार बागायतदार शेतकऱ्यांना निसर्गाने तडाखा दिला आहे. हातातोंडाशी आलेली पिके एप्रिल महिन्यातील पंधरा दिवसांत बेचिराख झाल्याने उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे.
यावर्षीच्या खरीप, रबी या दोन्ही हंगामात अवकाळी पाऊस, गारपिटीने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले. उत्पन्न हातात येईल असे वाटत असतानाच निसर्गाचा एक फटकारा शेतकऱ्यांना नुकसानीच्या खाईत लोटत आहे. सध्या रबी हंगामात पिके नसली तरी हळद काढून ठेवलेली आहे. शिवाय बागायती आणि फळ पिकांना फळधारणा झालेली असून, या दोन्ही पिकांपासून उत्पन्न हातात येणार होते. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात शेतकरी या पिकांची जोपासणूक करीत होता. मात्र, हवामान खात्याने पाच दिवस जिल्ह्याला यलो अलर्ट दिला. त्यानंतर आणखी एक दिवस वाढविला. त्यामुळे ८ ते १३ एप्रिल या सहा दिवसांत जिल्हाभरात अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याने पिकांचे नुकसान केले. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचा आढावा घेतला असून, एप्रिल महिन्यात १ हजार ४६ शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला आहे.
७८७ हेक्टरवरील पिके बाधित
■ पाचही तालुक्यांतील ७९७ हेक्टर क्षेत्रातील पिंके बाधित झाली आहेत. संपूर्ण एप्रिल महिन्यातील हे नुकसान आहे. जिल्हा प्रशासनाने त्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.
■ नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पंचनाम्यांची प्रतीक्षा लागली आहे.
■ सर्वाधिक फटका बसला ते आंबा आणि केळी या दोन पिकांनाच. आंबे परिपक्च होण्याच्या अवस्थेत होते.
■ येत्या आठवडाभरात हे आंबे बाजारात विक्रीसाठी आले असते. मात्र, वादळी वाऱ्याने आंब्याचे नुकसान झाले.
■ झाडाला लगडलेल्या कैऱ्या गळून पडल्या. केळीच्या पिकाचेही असेच हाल झाले.