नैसर्गिक आपत्ती व पीकविमा भरपाईत महत्त्वाच्या असणाऱ्या ई पीक पाहणीला पुणे जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत खरिपात पेरणी झालेल्या एकूण क्षेत्राच्या केवळ १७ टक्केच क्षेत्राची नोंद झाली आहे. त्यामुळे भरपाईसाठी आवश्यक असलेल्या या पीक पाहणीत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे यांनी केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ३० हजार ३९६ खातेदारांनी ३० हजार ७६२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची मोबाइल अॅपद्वारे नोंदी केली आहे. मात्र, जिल्ह्यात प्रत्यक्ष पेरणी एक लाख ७५ हजार १८१ हेक्टरवर झाली आहे. त्यामुळे पीक पाहणीचे प्रमाण १७.५६ टक्केच झाले आहे. सर्वाधिक पेरणी जुन्नर तालुक्यात २९ हजार ६० हेक्टरवर झाली असून येथे पीक पाहणी ९,०५७ हेक्टरवर अर्थात ३१.१७ टक्के झाली आहे. तर बारामती तालुक्यात प्रत्यक्ष पेरणी केवळ पाच हजार ३२४ हेक्टरवर झाली असून पीक पाहणी मात्र, ३,३१५ हेक्टरवर अर्थात ६२.२८ टक्के झाली आहे.
काय होतो लाभ
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास ई-पीक पाहणीची नोंद असल्यास नुकसान भरपाई अचूक व लवकर मिळते. पीक पेरणी अहवाल प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या सहभागामुळे कृषी पतपुरवठा सुलभ होतो. त्यामुळे खातेदारांनी मुदतीत पीक पाहणीची नोंद करावी, असे आवाहनही खराडे यांनी केले आहे
खरीप हंगामासाठी ई-पीक पाहणी मोबाइल अॅपद्वारे पीक पाहणी नोंदीची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या मुदतीत पीक पाणी नोंद करावी. - डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी