Join us

गाळप हंगामाबाबत मंगळवारी काय होणार निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 11:30 AM

इथेनॉलकरिता वळविण्यात येणाऱ्या साखरेव्यतिरिक्त ८८ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज

यंदा राज्यातील ऊस गाळप हंगाम सुरू करण्याबाबत मंगळवारी (दि. १७) निर्णय होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समिती हा निर्णय घेण्यात येणार असून, या बैठकीला उपमुख्यमंत्री व जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

यंदा राज्यात १ हजार २२ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार असून, इथेनॉलकरिता वळविण्यात येणाऱ्या साखरेव्यतिरिक्त ८८ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी हेच उत्पादन १०५ लाख टन इतके झाले होते. कर्नाटकमध्ये गाळप हंगाम लवकर सुरू होणार या शंकेने ही मागणी करण्यात आली होती. मात्र, कर्नाटकाप्रमाणेच महाराष्ट्रातही १ नोव्हेंबरदरम्यान गाळप हंगाम सुरू करावा असे सूर कारखानदार व्यक्त करत आहेत.

राज्यात गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय मंत्री समिती घेत असते. या समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात त्यानुसार मंगळवारी (दि. १७) शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील होणाऱ्या बैठकीत याचा निर्णय घेण्यात येणार आहे. या बैठकीला जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री वित्तमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, कृषिमंत्री धनंजय मुंडे, उद्योगमंत्री उदय सामंत तसेच साखर कारखानदार महासंघाचे प्रतिनिधी उपस्थित राहतील.

यंदा ११.२५ टक्के उतारा

राज्यात यंदा १४ लाख ७ हजार हेक्टरवर ऊस लागवड असून, त्यातून १ हजार २२ लाख टन ऊस उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यातील ९० टक्के ऊस गाळपास आल्यास एकूण ९२१ लाख टन ऊस प्रत्यक्ष गाळपासाठी उपलब्ध असणार आहे.

त्यातून सव्वा अकरा टक्के साखर उतारा अपेक्षित धरल्यास १०३.५८ लाख टन साखर उत्पादित होण्याचा अंदाज आहे. इथेनॉलकरिता १५ लाख टन साखर वळविल्यास व संभाव्य निव्वळ साखर उतारा दहा टक्के गृहीत धरल्यास राज्यात यंदा ८८.५८ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज साखर आयुक्तालयाने व्यक्त केला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ८७ हजार हेक्टर ऊस क्षेत्र कमी आहे. त्यामुळे ऊस उत्पादन घट होईल.

टॅग्स :ऊससाखर कारखानेशेतकरी