शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालाला दर मिळत नाही. ही बाब गव्हासाठीही लागू आहे. जो गहू शेतकऱ्यांकडून २० ते २२ रुपये किलोने विकत घेतला जातो, त्याच गव्हाचे ग्राहकांना खुल्या बाजारात ते ३८ रुपये द्यावे लागत ३२ असल्याचे चित्र आहे. दरातील या फरकाचा लाभ उत्पादक शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांच्या घशातच अधिक जात आहे.
विविध नैसर्गिक संकटांनी आधीच पश्चिम वऱ्हाडातील जिल्ह्यांमध्ये गव्हाचे लागवड क्षेत्र घटत चालले आहे. त्यातच शेतकऱ्यांकडून खरेदी केला जाणाऱ्या गव्हाला दर मिळत नाही. हंगामनिहाय माल पिकतो, तेव्हा दर गडगडतात आणि माल संपतो, तेव्हा दर वाढतात. शेतकऱ्यांचा माल कमी किमतीत घेऊन तो खुल्या बाजारात अव्वाच्या सव्वा दराने विकला जातो, हे चित्र वर्षानुवर्षांपासून कायम आहे.
यंदाही तशीच स्थिती उद्भवली असून, रब्बी हंगामात पिकलेला नवा गहू शेतकऱ्यांकडून बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आणला जात आहे. या शेतमालाला सध्या २००० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे; मात्र हाच गहू व्यवस्थित पॅकिंग करून खुल्या बाजारात ३२०० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटलने विक्री करून व्यापारी बक्कळ नफा कमवत असल्याचे दिसत आहे.
शेतकऱ्यांना फायदा मिळेना; सर्वसामान्य कुटुंबेही हैराण
लागवड खर्च आणि कठीण परिश्रमांच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या गव्हाला अपेक्षित दर मिळत नसल्याचे दिसत आहे. दुसरीकडे खुल्या बाजारात गव्हाचा प्रतिक्चिंटल दर ३२०० रुपयांपेक्षा अधिक झाल्याने सर्वसामान्य कुटुंबही हैराण झाले आहे.