मराठवाड्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ५६ टक्केच पाऊस पडल्याचा फटका खरीप हंगामातील सर्वच पिकांना बसला. चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसाच्या सरीमुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. असे असले तरी उत्पादनात मोठी घट होणार आहे. शिवाय रबी हंगामातील प्रमुख गहू पिकाचे क्षेत्र घटून ज्वारी, करडईचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली वगळता उर्वरित सहा जिल्ह्यांत आतापर्यंत अत्यल्प पाऊस पडला. मुसळधार पाऊस न झाल्यामुळे नदी, नाले कोरडे आहेत. परिणामी, भूजलपातळी दिवसेंदिवस खाली जात आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना जिल्ह्यांत यावर्षी सुमारे ९ लाख २८ हजार ७२८ हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
अत्यल्प पावसामुळे खरिपाचे उत्पादनात कमालीची घट होणार आहे. असे असले तरी चार दिवसांपासून पडत असलेला पाऊस आणि पुढील काही दिवस पावसाचे दिवस असल्याने खरीप पिकाला लाभ होईल. खरिपातील उडीद, मुगाच्या क्षेत्रावर आता रब्बी पिकांची पेरणी काही दिवसांत सुरु होईल. यंदा मात्र रब्बी गव्हाचे क्षेत्र घटणार आहे. -आर. टी. जाधव, विभागीय कृषी सहसंचालक
रब्बी हंगामातील प्रमुख पीक म्हणून गहू पिकाकडे पाहिले जाते. अपुऱ्या पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २१ टक्के गव्हाचे क्षेत्र घटून रब्बी ज्वारीचे क्षेत्र २८ टक्के वाढणार आहे.
जालना जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र सरासरी ३६ टक्क्यांपर्यंत घटण्याचा अंदाज आहे. रब्बी ज्वारीचे क्षेत्र केवळ १४ टक्के वाढण्याचा अंदाज आहे. तर बीड जिल्ह्यातही शेतकरी गव्हाऐवजी रब्बी ज्वारी आणि हरभरा सूर्यफूल, करडई या पिकांना प्राधान्य देण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.