शेतकऱ्याच्या लेका शेतीत यायला शिकशेती म्हणजे कष्टाची आणि मेहनतीची, इतकीच काय तिची ओळख पण आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण तिची सहज मशागत करू शकतो आणि आधुनिकतेच्या साहाय्याने आपण शेतीला सुद्धा सुगीचे दिवस आणू शकतो हे ही तितकेच खरे.
शेतकरी कुटुंबात दोन मुले असेल तर एकाने नोकरी आणि एकाने शेती करावी अशी शेतकरी कुटुंबाची जुनी धारणा, पण काळानुसार कुटुंबपद्धती बदलल्या आणि "हम दो हमारे दो" या प्रमाणे आई वडील आणि दोन मुले त्यात एक मुलगी आणि एक मुलगा अशी कुटुंब व्यवस्था उदयास आली. यात ज्या परिवारात एकच मुलगा होता आणि तो ही आता नोकरी निमित्ताने बाहेरगावी गेला अशा कुटुंबातील शेती ही एकतर मोल मजुरीवर अवलंबून झाली किंवा मग त्या परिवारातील म्हाताऱ्या आई वडिलांवर.
दिवसेंदिवस मजुरांची कमतरता अधिकाधिक जाणवायला लागली आहे. त्यातच मजूरीचे दरही खूप वाढलेले बघावयास मिळत आहे. वादळवारा पाऊस या सर्वांमुळे वेळेत शेती कामे होणे गरजेचे असते. त्यासाठी प्रसंगी चढाओढीने मजुरांना अधिकचे पैसे देऊन कामास ठेवले जाते. यात नुकसान होते ते म्हणजे अल्पभूधारक मध्यम वर्गातील शेतकऱ्यांचे ज्यांना वेळोवेळी तण नियंत्रण, लागवड, पीक काढणी अश्या विविध स्तरांवर मजूर उपलब्ध होत नाही. परिणामी पिकांचे नुकसान होते तर कधी वेळेवर पीक बाजारात न गेल्याने त्यास योग्य भाव मिळत नाही.
या परिस्थितीत मजुरांवर अवलंबून न राहता शेतकऱ्याचा लेक हप्त्याला सुट्टीच्या दिवशी शेतीत येऊन मदत करेल का? त्यालाही पुन्हा आपल्या शेतीची आस निर्माण होईल का ? पावसाळी पर्यंटन करताना, किंवा गड किल्ल्यांवर फिरायला जाऊन गर्दी करण्यापेक्षा तो आपल्या म्हाताऱ्या आई बापाला मदतीस येतो का? या अपेक्षेत गावातील शेतकरी बघावयास मिळत आहे. तर काही आई वडील भविष्यात शेती कोण कसेल? या भीतीने आपल्या मुलांना आता गावाकडेच ठेवू पाहत आहे.
-रविंद्र शिऊरकर
(लेखक स्वत: तरुण शेतकरी असून मुक्त कृषी पत्रकार आहेत.)