नितीन चौधरी
पुणे : राज्यातील हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्याच्या राज्य सरकारच्या उद्देशांना हरताळ फासण्यात आला आहे. नाफेड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लि. या दोन संस्थांनी सोयाबीन खरेदी केली आहे.
नाफेड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लि. या दोन संस्थांनी १४ लाख टनांचे उद्दिष्ट असताना २५ नोव्हेंबरपर्यंत २१० केंद्रांवर केवळ २७ हजार टन अर्थात २ टक्के सोयाबीनची खरेदी झाली आहे.
सोयाबीन खरेदीला आता १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र, शेतकऱ्यांकडे सोयाबीनच उपलब्ध नसल्याने ही खरेदी कशी केली जाईल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गेल्या वर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचे अनुदान दिल्यानंतर यंदा हमीभावाने सोयाबीन खरेदीचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे यंदा हमीभावाने सोयाबीन खरेदी केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल असा निर्णय राज्य सरकारने घेतला.
त्यासाठी ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटलने सोयाबीन खरेदी करण्याचे निर्देश नाफेड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लि. या दोन संस्थांना देण्यात आले.
केवळ २७ हजार ८२८ टन खरेदी
● नाफेडने त्यांच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार २५ ३ नोव्हेंबरपर्यंत केवळ २७ हजार ८२८ टन खरेदी झाली आहे. खरेदी एकूण उद्दिष्टाच्या केवळ २ टक्के इतकीच आहे.
● पूर्वीच्या खरेदीसाठी ३० नोव्हेंबरची मुदत देण्यात आली होती. मात्र, खरेदी केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्याने खरेदीसाठी १५ डिसेंबर अशी मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, उर्वरित सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट कसे पूर्ण होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
● सोयाबीन उत्पादन ऑक्टोबरच्या मध्यापासून सुरू होते. आता शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपले असून आता नेमक्या कोणत्या सोयाबीनची खरेदी केली जाईल, असा संतप्त सवालही शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
राज्यातील १९ जिल्ह्यांमधील असलेली सोयबीन खरेदी केंद्रे
राज्यातील १९ जिल्ह्यांत नाफेडची १४७ आणि सात जिल्ह्यांत एनसीसीएफची ६३ सोयाबीन खरेदी केंद्र आहेत. त्यात नाफेडच्या १४७ केंद्रांमध्ये अकोला जिल्ह्यातील ५, अमरावती ८, बीड १६, बुलढाणा १२, धाराशिव १५, धुळे ५. जळगाव १४, जालना ११, कोल्हापूर १, लातूर १४, नागपूर ८ नंदुरबार २, परभणी ८, पुणे १. सांगली २, सातारा १, वर्धा ८, वाशिम ५ व यवतमाळ ७ तसेच एनसीसीएफच्या ६३ केंद्रांमध्ये नाशिक ६, अहमदनगर ७, सोलापूर ११, छत्रपती संभाजीनगर ११, हिंगोली ९, चंद्रपूर ५ आणि नांदेड जिल्ह्यातील १४ केंद्रांचा समावेश आहे.
राज्य सरकारने १५ सप्टेंबर रोजी परिपत्रक जारी केले. नाफेडने १ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली. तर प्रत्यक्षात खरेदीला सुरुवात १५ ऑक्टोबरनंतरच झाली. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात यंदा सोयाबीनचे क्षेत्र ५० लाख हेक्टरवर पोहोचले आहे.
प्रति हेक्टरी १० क्विंटल उत्पादन गृहित धरले तरी राज्यात सुमारे ५० लाख टन सोयाबीन उत्पादन होऊ शकते, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. तरीदेखील राज्य सरकारने १४ लाख १३ हजार २७० टन खरेदीचे उद्दिष्ट दोन्ही संस्थांना देण्यात आले आहेत.
ऐन काढणीच्या वेळेस राज्यात पावसाने धुमाकूळ घातल्याने सोयाबीनला मोठा फटका बसला. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली. सोयाबीन खरेदी केंद्र वेळेत सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना कमी भावात बाजारात सोयाबीन विक्री करण्याशिवाय पर्याय उरला नाही.