लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य लोकसेवा आयोगाने एप्रिल आणि मे महिन्यातील नियोजित परीक्षेच्या तारखांमध्ये बदल केला आहे. मात्र, तीन आठवडे उलटूनही अद्याप परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर केलेल्या नाहीत. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे उमेदवार चिंतित झाले आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ साठी गतवर्षी डिसेंबर महिन्यात विविध संवर्गातील २७४ पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध केली होती. २८ एप्रिल रोजी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा तसेच १९ मे रोजी समाजकल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
यांसह आचारसंहिता लागू झाली असून, एप्रिल आणि मे महिन्यात राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे कार्याध्यक्ष महेश घरबुडे यांनी सांगितले, की परीक्षा पुढे ढकलून तीन आठवडे झाले आहेत.
मात्र, अद्याप नवीन तारखा जाहीर झालेल्या नाहीत. जाहिरातीमध्ये वर्ग १ चे एकही पदांचा समावेश करावा. यासोबतच संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर करावी. परीक्षेच्या तारखा केव्हा जाहीर होत आहेत, याकडे आता लक्ष आहे.
सुधारित मागणीपत्र प्राप्त होण्यास अनिश्चितता- महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेकरिता शासनाच्या विविध विभागांना गट-अ व गट-ब राजपत्रित संवर्गाकरिता प्राप्त मागणीपत्रामध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन सुधारित मागणीपत्र पाठविण्याबाबत सूचना दिल्या आहेत.- मागणीपत्र आयोगास प्राप्त होण्याच्या कालावधीत निश्चितता नसल्याने परीक्षेची सुधारित तारीख जाहीर करता येत नसल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले आहे. मात्र, पूर्वपरीक्षेसाठी पुरेसा वेळ देत नवीन तारीख जाहीर करणार असल्याचे सांगत दिलासा दिला आहे.
जुन्या परीक्षा पद्धती नुसार शेवटची संधीजुन्या परीक्षा पद्धतीनुसार ही शेवटची संधी असणार आहे. त्यामुळे राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तारीख जाहीर केली तर त्या दृष्टीने आम्हाला तयारी करता येईल, असे मत एका उमेदवाराने व्यक्त केले.
युपीएससी करू शकते, एमपीएससी का नाही?केंद्रीय लोकसेवा आयोगाने परीक्षेच्या तारखेत बदल केला तसेच या परीक्षा दि. १६ जून रोजी आयोजित करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एमपीएससीला का शक्य नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अधिक वाचा: तलाठी भरती; नव्याने नियुक्त होऊ घातलेले तलाठी कधी होणार रुजू