सातारा : जिल्ह्यात वर्षभरापूर्वी १५६ तलाठी पदांची भरती झाली होती. यासाठी सुमारे २५ हजारांहून अधिकजणांनी परीक्षा दिल्यानंतर १५५ जणांची अंतिम यादी जमाबंदी आयुक्तांकडून प्रसिद्ध झाली आहे. परंतु, अद्यापही उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती मिळाली नाही. त्यामुळे परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
याबाबत माहिती अशी, जिल्ह्यात १५६ पदांची भरती प्रक्रिया ऑगस्ट-सप्टेंबर २०२३ मध्ये पार पडली. परीक्षेसाठी तब्बल ३० हजार ४३६ अर्ज प्राप्त झाले तर २५ हजारहून अधिकजणांनी परीक्षा दिली होती. जिल्ह्यातील सात परीक्षा केंद्रांवर तीन सत्रांत ही परीक्षा झाली. तलाठी भरतीची परीक्षा प्रथमच टीसीएसमार्फत ऑनलाइन पद्धतीने झाली.
यानंतर परीक्षार्थीचे लक्ष निकालाकडे लागले होते. परंतु, निकालाबाबत आरोप होऊ लागल्यामुळे उमेदवारांना मोठा धक्का बसला होता. अखेर या परीक्षेनंतर तब्बल सहा महिन्यांनी परीक्षेचे सामान्यकृत गुण ६ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध झाले. अंतिम निवड यादी झाली. यानंतर मार्च महिन्यात पुन्हा सुधारित यादी प्रसिद्ध करण्यात आली.
सातारा जिल्ह्यातील १५५ जणांची यादी जमाबंदी आयुक्तांकडून देण्यात आली आहे. या उमेदवारांच्या आरक्षणानुसार कागदपत्रांची पडताळणी ज्या त्या शासकीय कार्यालयांकडे सुरू आहे. ज्या उमेदवारांच्या पडताळणीची गरज नाही, त्या ३८ जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.
मात्र, याच दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने ही प्रक्रिया जैसे थे या अवस्थेत आहेत. नियुक्तीबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे विचारणा केली होती. आचारसंहितेनुसार कुठल्याही पदासाठी नियुक्ती देता येत नसल्याने यासंदर्भात राज्य सरकारने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केला होता.
आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीच ही प्रक्रिया सुरू झाली असल्याने या उमेदवारांना नियुक्ती द्यावी, असे पत्रात नमूद होते. परंतु, नियुक्तीला मान्यता देता येणार नसल्याचे आयोगातील सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे या उमेदवारांना आचारसंहिता संपल्यानंतर स्पष्ट नियुक्त्या मिळू शकतात.
अपुऱ्या मनुष्यबळामुळे प्रशासनावर ताण• जिल्ह्यातील तलाठी संवर्गातील पदे रिक्त असल्यामुळे प्रशासनावर ताण येत होता. त्यामुळे अनेक दिवसांपासून रिक्त पदे भरण्याबाबत प्रक्रिया सुरू होती तर अनेक उमेदवार भरती कधी होणार याच्या प्रतीक्षेत होते.• अखेर याची बिंदुनामावली बनवून जमाबंदी आयुक्तांना पाठवल्यानंतर १५६ पदे भरण्यासाठी मान्यता मिळाली व राज्य शासनाने दि. २३ जून २०२३ रोजी तलाठी भरती २०२३ ची अधिसूचना जाहीर केली होती. यास वर्ष होत आले आहे. ज्यावेळी सर्व पात्र उमेदवारांना नियुक्त्या मिळतील, त्यानंतरच प्रशासनावरी ताण कमी होईल.
तलाठी एक; गावे अनेकवन व महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सज्जांच्या ठिकाणी तलाठ्यांना उपस्थिती बंधनकारक केले आहे. परंतु, जिल्ह्यात ४५५ तलाठ्यांवरच जिल्ह्यातील १७०० हून अधिक गावांचा कारभार सुरू आहे. त्यामुळे एका तलाठ्याकडे किमान दोन ते तीन सज्जांचा पदभार आहे. सज्जातील गावांना भेटी देणे, पंचनामे, स्थळ पाहणी, बैठका, तपासणी, अहवाल ही कामे तलाठ्यांना करावी लागतात. काही वेळा सज्जा मुख्यालयीन कार्यालयामध्ये उपस्थित राहता येत नाही.
अधिक वाचा: सातबारा उताऱ्यावर चुकीचे नाव लागले असेल तर नावात बदल करता येऊ शकतो का?