हापूस आंबा आणि कोकणचे एक वेगळे नाते आहे. कोकणातील जांभा दगडाची भरपूर खनिजयुक्त जमीन, अरबी समुद्राची आणि खाड्यांची खारी हवा, भरपूर सूर्यप्रकाश, हापूस आंब्याला आवश्यक आहे. अशा स्वरूपाची आदर्श नैसर्गिक व्यवस्था यातून जगातील सर्व फळांचा राजा हापूस आंबा कोकणात मोठ्या प्रमाणात पिकतो.
हे कोकणचे मुख्य पीक आहे आणि ही कोकणातील शेतकऱ्यांची मुख्य अर्थव्यवस्था आहे. कोकणात दरवर्षी तीन लाख टन म्हणजेच दोन कोटी हापूस आंब्यांच्या पेट्या इतके हापूसचे उत्पादन निघते म्हणे. परंतु, गेले काही वर्षे कोकणचा आर्थिक कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूसला एकापाठोपाठ एक धक्के बसत होते.
अनेक आव्हाने कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांसमोर उभी राहिली होती. कोरोनाच्या परिस्थितीत तर, एकीकडे बाजारपेठ ठप्प आणि दुसरीकडे निसर्गाचा कोप सुरू होता. सलग तीन-चार वर्षे हे प्रकार सुरू होते. या परिस्थितीने कोकणचा राजा अर्थात हापूस आंबा बागायदार काहीसा हरला होता.
त्याआधी निसर्ग वादळाने झोडपले आणि त्यानंतर तौक्ते वादळाच्या तडाख्यात होता नव्हता तोही आंबा गळून पडला होता. एकापाठोपाठ एक अशी संकटे कोकणच्या बागायतदार व शेतकऱ्यांनी खूप झेलली आहेत. कोरोनाच्या परिस्थितीमुळे तर, हा बागायतदारवर्ग पूर्णतः खचला होता.
परंतु, निसर्गासमोर हरलेला बागायतदार यावर्षी कमी कालावधीत योग्य उत्पादन घेताना दिसत आहे. हापूस आंब्याचे उत्पादन करण्यासाठी खते, फवारण्या, कामगार, लाकडी पेट्या, पॅकिंगचा खर्च येत असतो. त्यासाठी साधारण हजार-बाराशे रुपये खर्च आणि आंबे विकल्यानंतर केवळ सातशे आठशे रुपये उत्पन्न मिळणार असेल तर, तो व्यवसाय कशाला असे म्हणण्याची वेळ येते.
प्रचंड परिश्रम करून अनेकदा शेतकऱ्याला वर्षाच्या शेवटी नुकसान होते आणि कर्जही वाढते. कारण आधुनिक पद्धतीने आंबा पीक घेताना येथील शेतकऱ्याला प्रचंड परिश्रम घ्यावे लागत आहेत, शिवाय पैसाही तितकाच खर्च करावा लागत आहे. त्यासाठी विमा संरक्षण काही शेतकरी घेत असले तरी त्यातून तुटपुंजी रक्कम हाती लागते.
मुळात कोकणातील स्वाभिमानी शेतकरी सरकारकडे कधीच कर्जमाफी, नुकसानभरपाई मागत नाही आणि सरकारी यंत्रणा त्याला कधी मदतही करत नाही. तरीही स्वयंपूर्ण पद्धतीने वर्षानुवर्षे कोकणातील आंबा बागायतदार काम करीत आहेत. परंतु, जेव्हा नैसर्गिक संकटे येतात तेव्हा केवळ 'लढ' म्हणण्यापेक्षा सरकारने आर्थिकदृष्ट्या आधार देण्याची गरज असते.
तरच, हा शेतकरी तरू शकतो. अन्यथा नव्याने आंबा लागवड करून या व्यवसायात उतरलेला तरुण यामध्ये टिकाव धरू शकत नाही. त्यासाठी कोकणातील शेतकरी आणि हापूस आंब्याची शेती याचे दीर्घकालीन नियोजन करून जगाला भुरळ घालणारा हापूस आंबा पुन्हा त्याच्या मूळ स्वरूपात कसा येईल आणि कोकणातील स्वाभिमानी शेतकरी आर्थिक समृद्ध जीवन कसे जगू शकेल याचे प्रदीर्घ नियोजन केले पाहिजे.
परंतु, अनेक वर्षांत हा बदल घडू शकलेला नाही. यावर्षी जानेवारीपासून आंबा उत्पादनाला सुरुवात झाली. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्पादन चांगले असले तरी बाजारपेठेत आवक जास्त वाढल्याने दर कमी आला आहे. स्थानिक ग्राहकांच्या दृष्टीने ही जमेची बाजू असली तरी निर्यात मालाच्या बाबतीत दर घसरल्यास ते नुकसानदायी होते.
आज निर्यात मालाला गल्फ देशात एक हजार रुपये डझन इतका दर मिळत आहे. मात्र, त्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांची अक्षरशः फरफट सुरू आहे. निर्यात मालाच्या दृष्टीने देवगड जामसडे व रत्नागिरी तालुक्यातील नाचणे येथे उभारलेली यंत्रणा खितपत पडली आहे.
देवगडची यंत्रणा बंदच पडली आहे आणि रत्नागिरीची कशीबशी सुरू आहे. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदारांना आजही हापूस आंब्यासाठी कंटेनर किंवा ट्रकची गुणवत्ता तपासणी, ग्रेडिंग, पॅकिंग आणि लोडिंगसाठी लासलगाववर अवलंबून रहावे लागत आहे.
यावर्षी हापूस आंबा १५ मेपर्यंतच पुरवठ्याला येईल, त्यांनतर आंबा संपलेला असेल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात हापूसची विक्री आणि खरेदीच्या बाबतीत मोठी कसरत करावी लागणार आहे.
- संदीप बांद्रे