वर्ष उलटून गेले तरी (२०२२- २३ मध्ये) शेतकऱ्यांनी भरलेल्या पीक कर्जावरील व्याजाची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झालेली नाही. बँकेने शेतकऱ्यांचे पैसे वर्षभर वापरले आहेत. शेतकऱ्यांकडून व्याज घेतात, मग शेतकऱ्यांच्या रकमेवरील व्याज बँक देणार का? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
कर्जफेडीसाठी ३१ मार्च जवळ आला की, शेतकरी पीक कर्ज भरण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे उलाढाल करत असतो. कोणी काढून ठेवलेले शेतातील धान्य मिळेल त्या भावाने विकतो तर कोणी घरातील दागदागिने गहाण ठेवून हे कर्ज व त्यावरील व्याज भरत असतो.
जिल्हा बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध करून देत असते. असे असले तरी या कर्जावर सहा टक्के व्याज आकारले जाते. मात्र, नियमित म्हणजेच ३१ मार्चच्या आत कर्जाची परतफेड केल्यास शेतकऱ्यांनी भरलेल्या सहा टक्के व्याजाची रक्कम पुन्हा शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होते.
तसेच आकारलेले हे व्याज पुन्हा शेतकऱ्यांच्या खात्यात दोन टप्प्यात वर्ग होते. यात डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत तीन टक्के तर केंद्र सरकार व्याज सवलत तीन टक्के असे भरलेले सहा टक्के व्याज शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होते. मात्र, भरलेल्या व्याजाची रक्कम खात्यात वर्ग होण्यासाठी शेतकऱ्यांना काही महिन्यांची तरी वाट पाहावी लागते.
शेतकऱ्यांनी २०२२-२३ मध्ये उचललेले पीक कर्ज व्याजासह ३१ मार्च २०२३ संपण्यापूर्वीच भरले. मात्र, वर्ष उलटून गेले तरी अद्यापही शेतकरी ह्या सहा टक्के व्याजाच्या प्रतीक्षेत आहेत. आम्ही भरलेल्या व्याजाची रक्कम बँकेने वर्षभर वापरली. मग आता आमच्या या रकमेवर शासन व्याज देणार का? असा सवाल शेतकऱ्यांमधून केला जात आहे.
ती रक्कमही खात्यात वर्ग करासन २०२३-२४ मध्ये अनेक शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज ३० मार्च किंवा अगोदर भरले. हे कर्ज भरताना शेतकऱ्यांनी या कर्जावरील सहा टक्के व्याजसुद्धा जमा केले. मात्र ३० मार्च रोजी सायंकाळी २०२३-२४ मध्ये घेतलेल्या कर्जावर व्याज आकारले जाऊ नये, असे परिपत्रक जिल्हा बँक स्तरावरून काढण्यात आले. त्यामुळे भरून घेतलेल्या व्याजाची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावी, अशी मागणी होत आहे.