दत्ता लवांडे
यंदा अवेळी पडलेल्या पावसामुळे उसाचे क्षेत्र घटलेले आहे. त्यामुळे साहजिकच साखरेचे उत्पादन घटणार आहे. महाराष्ट्रात सरकारने ऊस निर्यात बंदी केल्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून अनेक ठिकाणी सरकार विरोधात निदर्शने आणि आंदोलने सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव मिळावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
दरम्यान, येणाऱ्या १ नोव्हेंबर पासून यंदाचा गळीप हंगाम सुरु होणार असल्याच्या चर्चा असल्या तरीही अजून गळीप हंगामाची अधिकृत तारीख ठरलेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक होऊन यंदाच्या गळीत हंगामाची तारीख ठरवली जाणार आहे. येत्या पाच सहा दिवसांमध्ये ही बैठक होणार असल्याची माहिती साखर संकुलातील अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.
राज्यात किती कारखान्यांना परवानगी?
राज्यात साधारण 211 चालू कारखाने आहेत. तर यावर्षी राज्यभरातून आत्तापर्यंत 217 कारखान्यांचे क्रशिंग अर्ज प्रशासनाकडे आलेले आहेत. गळीत हंगामाची तारीख जाहीर झाल्यानंतर या कारखान्यांना परवानगी देण्यात येणार आहे अशी माहिती विकास शाखेच्या सचिन बऱ्हाटे यांनी दिली.
साखरेचे उत्पादन घटणार
यंदा लांबलेल्या मान्सूनमुळे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील ऊस शेतीला फटका बसला आहे. जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये पाऊस न पडल्यामुळे अनेक धरणांची पाणीपातळीही पुरेशी नाही. सध्या मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला असून धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता कमी आहे. यामुळे ऊस आणि साखर उत्पादन घडणार असून केंद्र सरकार साखर निर्यातीवर बंदी आणण्याची शक्यता आहे.
आम्ही मंत्री समितीला १ नोव्हेंबर ही तारीख दिली असून त्यांच्या बैठकीमध्ये गळीत हंगामाच्या शुभारंभाची तारीख ठरेल. परवानगीसाठी आमच्याकडे आतापर्यंत 217 कारखान्याचे अर्ज आले आहेत. उसाचे क्षेत्र कमी झाले असल्याने यंदा मार्च महिन्यापर्यंत गळीत हंगाम सुरू राहणार असल्याची शक्यता आहे. - सचिन बऱ्हाटे (सहाय्यक संचालक, विकास शाखा, साखर आयुक्तालय)