प्रविण खिरटकर
चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन पिकावर यंद पहिल्यांदाच पिवळा मोझॅक नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. अशी अचानक रोगराई येण्यासाठी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे चुकले कुठे? या प्रश्नाने कृषी विभागही हैराण आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ६७ हजार ७६६ हेक्टरवर सोयाबीन लागवड होते. वरोरा, भद्रावती, चिमूर, राजुरा, कोरपना, गोंडपिपरी, पोंभुर्णा या तालुक्यातील शेतकरी सोयाबीन उत्पादनात आघाडीवर असतात. या पिकावर ऑगस्टच्या सुमारास पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला. शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून पिकांची काळजी घेतली. मात्र नैसर्गिक आपत्ताने नुकसान केलेच.
संबंधित वृत्त :https://www.lokmat.com/agriculture/farming-ideas/current-pest-management-in-soybean-crops-a-a975/
कृषीतज्ज्ञांचा दावा कितपत खरा?
कृषी विभागाने प्रयत्न करून या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी मोहीम हाती घेतली. १५ ते १८ सप्टेंबरच्या आसपास अचानक सोयाबीनचे पीक काळवंडले. पावसाचा खंड, वाढलेले उष्णतामान आणि रोगाचा प्रादुर्भाव यामुळे हे घड कृषीतज्ज्ञ सांगत आहेत. मात्र, जनजागृतीची मोहीम खरोखरच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली काय, याचीदेखील तपासणी करण्याची आता गरज निर्माण झाली आहे.
लक्षणे काय आहेत?
मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास सोयाबीन पानाच्या मुख्य शिरांजवळ विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे अथवा अनियमित पट्टे दिसतात. त्यानंतर पाने जशी परिपक्च होत जातात तशी त्यावर गंजलेले तांबूस रंगाचे चट्टे दिसतात. काही वेळा जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात व मुरगळतात. पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण झाड पिवळे पडते. अशा झाडांना कालांतराने फुले व शेंगा कमी लागतात. यातून उत्पन्नात मोठी घट येते. दाण्यांतील तेलाचे प्रमाण घटते तर प्रथिनांच्या प्रमाणात वाढ होते. हा विषाणू पानांतील रसामार्फत पसरतो. विषाणूचा प्रसार पांढरी माशी किटकाद्वारे होतो.
पीकेव्ही संशोधकांच्या आगमनाची प्रतीक्षा
मृदा म्हणजे (माती) संतुलनात मोठा बिघाड निर्माण झाला. हे संतुलन पुन्हा निर्माण करण्याचे मोठे आव्हान यंत्रणेपुढे आहे. यासंदर्भात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (पीकेव्ही) संशोधकांना बोलावून मोझॅक रोगाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. त्यामुळे शासनाच्या पॅकेजसह संशोधकांच्या आगमनाकडेही शेतकऱ्यांच्या नजरा आहेत.
शेतकरी तातडीने काय करू शकतात?
- रोगग्रस्त पाने, झाडे वेळोवेळी काढून नष्ट करावीत, निरोगी झाडांवरील प्रसार कमी होईल.
- वेळोवेळी पिकाचे कीड व रोगांसाठी निरीक्षण व सर्वेक्षण करावे, पांढ माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिका एकरी १० पिवळे चिकट सापळे लावावेत.
- शिफारस केलेली कीटक- नाशक फवारणी करावी. नत्रयुक्त खताया अतिरिक्त वापर टाळावा. कमीत कमी पहिले ४५ दिवस पीक तणमुक्त ठेवावे, असा सल्ला चंद्रपूर कृषी विभागाने दिला आहे.