मानवी आरोग्य व जमिनीच्या आरोग्याच्या दृष्टीने सेंद्रिय शेती करणे फायद्याचे आहे. त्यामुळेच अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत. शेतकरी गटाच्या गटाच्या माध्यमातून या शेतीला प्रोत्साहनही दिले जात आहे. मात्र यातून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याची ओरडही होत आहे.
कमी वेळात जास्त उत्पादन मिळत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांचा कल रासायनिक शेतीकडे वाढला आहे. जास्त उत्पादन मिळविण्यासाठी मशागतीपासून ते पीक काढण्यापर्यंत खत, कीटकनाशक, तणनाशक आदी घटकांचा उपयोग केला जात आहे. यातून उत्पादनात व उत्पन्नात भर पडत असली तरी रासायनिक शेतीमुळे मानवी शरीरावर परिणाम होण्याची शक्यता बळावत आहे. शिवाय जमिनीचा पोतही बिघडत आहे. त्यामुळेच आरोग्य जपणारे नागरिक सेंद्रिय शेतीतून पिकवलेल्या अन्नधान्याला पसंती देत आहेत. शासनानेही जैविक शेती मिशन हाती घेतले आहे.
सेंद्रिय भाजीपाला लागवडीसाठी प्रोत्साहन
सेंद्रिय भाजीपाला लागवडीस प्रोत्साहन मिळावे, पर्यायाने विषमुक्त भाजीपाला मिळावा, या उद्देशाने शासन विविध योजना राबवत आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे.
सेंद्रिय भाजीपाला आरोग्यासाठी लाभदायी
सेंद्रिय भाजीपाला आरोग्यासाठी लाभदायी असतो. रासायनिक खते. कीटकनाशकाचा वापर होत नसल्याने विषमुक्त भाजीपाला मिळतो.
उत्पादन खर्चात बचत
- सेंद्रिय शेतीमुळे उत्पादन कमी मिळत असले तरी शेतमालाला चांगला भाव मिळतो.
- शिवाय उत्पादन खर्चात मोठी बचत होते. सध्या सेंद्रिय पिकांना मागणी आहे.
शेतकरी म्हणतात...
जमिनीचा पोत सुधारण्यासाठी तसेच मानवी आरोग्याच्या दृष्टीने सेंद्रिय शेती करणे फायद्याचे आहे. मात्र ही शेती अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी फारशी फायद्याची ठरत नाही. - डी. एम. माखणे, शेतकरी
जिल्ह्यात ४० हेक्टरवर सेंद्रिय शेती
जिल्ह्यात जवळपास ४० हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती केली जाते. वसमत व सेनगाव तालुक्यात सध्या परंपरागत कृषी विकास योजना अंतर्गत जवळपास ४० गटांच्या माध्यमातून सेंद्रिय शेती केली जात आहे. आगामी काळात जैविक शेती मिशनच्या माध्यमातून जवळपास ३५०० एकर क्षेत्रावर सेंद्रिय शेती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.