पुणे: यंदाचा गळीत हंगाम नोव्हेंबर पासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांचे अध्यक्षतेखालील मंत्री समितीच्या बैठकीला अजून मुहूर्त मिळाला नसून या बैठकीत हंगामाच्या शुभारंभाची तारीख ठरवण्यात येणार आहे. हंगाम सुरू होण्याआधी शेतकरी संघटनेचे शेतकऱ्यांना 400 रुपयांचा हफ्ता देण्यासाठी आणि ऊसाला चांगला हमीभाव देण्यासाठी आंदोलन सुरू आहे. पण मागच्या वर्षी शेतकऱ्यांना सर्वात जास्त आणि सर्वांत कमी हमीभाव कुठल्या कारखान्याने दिला होता आपल्याला माहिती आहे का?
दरम्यान, मागच्या वर्षी राज्यात 211 साखर कारखान्यांनी गळीत हंगाम पार पाडला. काही कारखान्यांनी 2000 पेक्षा कमी तर काही कारखान्यांनी 3000 पेक्षा जास्त भाव शेतकऱ्यांना दिला आहे. उसाच्या सर्वांत कमी आणि सर्वांत जास्त भावामध्ये तब्बल 1338 रुपयांचा फरक होता.
गळीत हंगाम 2022-23 मध्ये सर्वाधिक दर कोल्हापूर विभागातील दालमिया भरत साखर कारखान्याने दिला होता. तोडणी आणि वाहतूक खर्च वजा जाता शेतकऱ्यांना 3177 रुपये प्रति टन एवढा भाव मिळाला होता. तर सर्वाधिक कमी भाव अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील साजन साखर कारखान्याने दिला होता. या शेतकऱ्यांना तोडणी आणि वाहतूक खर्च वजा जाता 1839 रुपये प्रति टन एवढा भाव मिळाला होता.
साजन साखर कारखान्याकडून वाहतूक आणि तोडणी खर्च प्रति टन 1146 रुपये एवढा आकारला होता. मागच्या वर्षी 211 पैकी 198 कारखान्यांनी 3000 पेक्षा कमी भाव दिला होता. तर केवळ 13 कारखान्यांनी 3000 पेक्षा जास्त भाव शेतकऱ्यांना दिला होता दिला. 3000 पेक्षा कमी भाव देणाऱ्या 198 कारखान्यांपैकी 12 साखर कारखान्यांनी 2000 पेक्षा कमी भाव शेतकऱ्यांना दिला होता.
FRP मधून शेतकऱ्यांना किती मिळतात पैसे?
दरवर्षी केंद्र सरकारकडून उसासाठी एफ आर पी जाहीर केला जातो त्यासाठी उसाचा उतारा सुद्धा निश्चित केला जातो. जसा उतारा वाढेल किंवा कमी होईल त्यानुसार एफ आर पी मध्येही बदल होत असतात. शासनाने जाहीर केलेले एफआरपी मधून तोडणी आणि वाहतूक खर्च वजा करून शेतकऱ्यांना रक्कम अदा केली जाते.
तोडणी आणि वाहतूक खर्च वजा जाता 3000 पेक्षा जास्त भाव दिलेले 13 कारखाने कोणते?
1) भोगवती साखर कारखाना, ता. करवीर, जि. कोल्हापूर (3094.41)2) दूधगंगा साखर कारखाना, बिद्री, ता. कागल (3089.55)3) कुंबी कासारी साखर कारखाना, कुडित्रे, ता. करवीर, जि. कोल्हापूर (3150)4) देशभक्त रत्नप्पा अण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखाना गंगानगर, इचलकरंजी, ता. हातकणंगले (3103.50)5) तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना ता. पन्हाळा (3024.60)6) दालमिया भारत साखर कारखाना ता. पन्हाळा (3177.79)7) राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना, ता. वाळवा, जि. सांगली (3105.57)8) राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना युनिट-2 ता.वाळवा, जि. सांगली. (3104.29)9) राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना युनिट-3 ता.वाळवा, जि. सांगली. (3105.76)10) पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना ता. कडेगाव, जि. सांगली (3167.72)11) क्रांती अग्रणी डॉक्टर जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना कुंडाळ, ता. पलूस, जि. सांगली (3101.22)12) तालमीया भारत साखर कारखाना कोकरूड, ता. शिराळा, जि. सांगली (3027.88)13) यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना रेठरे बुद्रुक, ता. कराड, जि. सातारा (3023.61)
तोडणी आणि वाहतूक खर्च वजा जाता 2000 पेक्षा कमी भाव दिलेले 12 कारखाने कोणते?
(कारखान्याचे नाव - कारखान्याने उसाला दिलेला हमीभाव)
1) सिद्धनाथ शुगर मिल्स तिरहे, उत्तर सोलापूर (1974.42)2) भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड लवंगी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर (1999.58)3) साजन कारखाना ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर (1839.03)4) धाराशिव साखर कारखाना ता. कळवण, जि. नाशिक (1988.04)5) अंबाजी ट्रेडिंग कॉर्पोरेशन जळगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव (1884.39)6) संत एकनाथ सहकारी साखर कारखाना पैठण, जि. छत्रपती संभाजी नगर (1977.16)7) रामेश्वर सहकारी साखर कारखाना शिपोरा बाजार, ता. भोकरदन, जि. जालना (1968.14)8) साईबाबा साखर कारखाना शिवनी, जि. लातूर (1993.37)9) पैनगंगा साखर कारखाना वरुड धड, जि. बुलढाणा (1851.48)10) मानस ऍग्रो इंडस्ट्रीज युनिट-1 बेला, ता. उमरेड, जि. नागपूर (1997.67)11) मानस ऍग्रो इंडस्ट्रीज युनिट -2 बेला, ता. उमरेड, जि. नागपूर (1877.41)12) व्यंकटेश्वर पावर प्रोजेक्ट मौडा, जि. नागपूर (1984.60)