सध्या सर्वत्र भातशेती पिकून तयार झाली असल्याने भात कापणीचा हंगाम सुरू आहे. मात्र, भात कापणीच्या हंगामात विंचू दंशापासून नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे. यावर्षी पावसाने चांगली साथ दिल्याने भातशेती चांगलीच बहरली आहे; परंतु, अवकाळी पावसाचा काही नेम नसल्याने शेतकऱ्यांकडून घाईघाईनेच भात कापणी केली जात आहे; परंतु, भात कापणी करताना अनेकदा बेसावध असल्यामुळे विंचू दंशाचे प्रकार घडतात. त्यामुळे भात कापणी करताना नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यात भात कापणीचे कामे जोरात सुरू असून ती आता अंतिम टप्प्यात आहेत.
काळजी काय घ्यावी?
- शेतात काम करताना पायात गमबूट वापरणे.
- हातात रबरी हॅन्डग्लोज घालणे.
- जास्त तापमानात भात कापणी करू नये.
- तत्काळ उपचारासाठी दाखल व्हावे.
वेळेवर उपचार घ्या
ग्रामीण भागात बहुतांश वेळा विंचू दंश झाला तर त्याला सुरुवातीला मांत्रिकाकडे विप उतरविण्यासाठी नेण्यात येते. मात्र, यामुळे उशीर होऊन वेळप्रसंगी त्या रुग्णाच्या शरीरात विष पसरले जाऊन जीवितास धोका निर्माण होतो. त्यामुळे विंचू दंश झाल्यास रुग्णाला त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करावे, जेणेकरून रुग्णाचे प्राण वाचतील.