नोकरीएवजी सुशिक्षित तरुणाने केली मशरुमची शेती
अलीकडच्या काळात अनेकजण आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतून भरघोस उत्पादन घेत आहेत. तर काहीजण नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय करीत आहेत. अर्धापूर तालुक्यातील पार्डी म. येथील किशोर कल्याणकर नोकरीच्या शोधात असताना मशरूमची शेती करण्याचा निर्णय घेतला. मशरूमच्या लागवडीत भरपूर रोजगार आणि आर्थिक फायदे असल्याची माहिती किशोर कल्याणकर यांनी दिली आहे. एकीकडे देशातील लाखो लोक रोजगाराच्या शोधात आहेत. तर दुसरीकडे असे अनेक लोक आहेत जे स्वतःचा व्यवसाय करून चांगला नफा तर मिळवत आहेत; पण अनेकांना मशरूमच्या शेतीतून भविष्यात चांगला फायदा होणार आहे.
किशोर यांनी प्रथम कच्या शेडची उभारणी केली. हे उभे करण्यासाठी कमी खर्च आला; तसेच सध्या हरभरा व गहू पिकांची काढणी सुरू असल्याने मशरूम तयार करण्यासाठी लागणारे कुटार शेतकऱ्यांना मोफत दिले आहेत. फक्त त्यांना कॅरिबॅग, प्लास्टिक स्ट्रे आणि मशरूम बी यांचा खर्च लागला आहे. सध्या मशरूम निघत आहेत. मशरूम लागवडीनंतर एक महिन्यानंतर मशरूमचे उत्पादन सुरू होते. सुरुवातीला मार्केट तयार करण्यासाठी वेळ लागेल; मात्र हळूहळू मार्केट तयार होऊन मशरूमची मागणी वाढेल. या पिकापासून चांगला फायदा होईल. नैसर्गिक मशरूमची निर्मिती करण्यात येत असल्याने बाजारपेठेत मागणी वाढेल, असे त्यांनी सांगितले.
गांडूळ खताची निर्मिती
मशरूम दोन तीन काढणीनंतर कुटार फेकून न देता त्याच्यापासून गांडूळ खत तयार करण्यात येणार आहे. या खताचा वापर भाजीपाला पिकासाठी करण्यात येणार आहे.
मशरूम आरोग्यासाठी फायदेशीर
शेतकऱ्यांनी शेती करीत मशरूमची लागवड करावी. मशरूमचे उत्पादन वाढावावे. मशरूम हे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने डॉक्टरही मशरूमचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात.- किशोर कल्याणकर