नितीन कांबळे
"फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार" या संत गोरोबा काकांच्या ओळी आजही जिवंत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत असतं मात्र आधुनिक काळात ही कला जोपासत असताना आयुष्यालाच आकार राहिला नसल्याची खंत बीड जिल्ह्यातील डोंगरगण येथील विष्णू गोरे यांनी व्यक्त केली.
आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथील विष्ष विष्णू गोरे मातीच्या विविध कलाकृती चाकावर तयार करतात. त्यांची ही तिसरी पिढी आणि कलाही कायम जोपासत आहेत. माती, घोड्याची लिद, सरपण, पाणी यात त्यांचा वर्षाकाठी ३० हजार रुपये खर्च होतो. यातून ते रांजण, माठ, तोटी असलेली टाकी, चूल, बोळके, पणत्या, लक्ष्मी मूर्ती तयार करतात. पण, हे सगळे करताना मोठ्या प्रमाणावर काबाडकष्ट करावे लागतात.
पत्नी मुलगा यांच्या मदतीने ते कला जोपासत आहेत. आता पूर्वीसारखी किंमत आणि व्यवसायाला मागणी नसल्याने त्यांच्यासमोर आर्थिक डोंगर उभा राहतो. कामासाठी बाहेरगावी किंवा ऊसतोडणीला जाण्याऐवजी गावातच हा व्यवसाय करतात काळानुसार माणसं बदलत चालली आहेत. त्यामुळे एवढे कष्ट करूनदेखील हाताला चटके बसत आहेत.
शासनाने कोणत्या तरी योजनेतून आर्थिक साह्य उपलब्ध करून दिले तर बळ मिळेल, अशी अपेक्षा आशा गोरे यांनी व्यक्त केली
वर्षाकाठी असा होतो खर्च
मातीचे साहित्य बनविताना मातीला १५ हजार, घोड्याची लिद १० हजार, सरपण ५ हजार यासह किरकोळ खर्च वर्षाकाठी ३० ते ३५ हजार रुपये होतात.
शेतकरी वर्ग एकेकाळचा मोठा खरेदीदार
शेतात काम करतांना थंडगार पाणी पिण्यास मिळावे. घरी भाकर करण्यासाठी कुंभाराकडील चूलच हवी, घरी कुटुंब मोठे असले तर पाणी साठवणूक करण्यापासून ते वापरण्यापर्यंत रांजण अशी विविध वस्तूंची शेतकरी बांधव खरेदी करायचे.
परंतु अलिकडे आधुनिकतेच्या ओघात मातीचे भांडे खरेदी करणार्यांची संख्या कमी झाली असल्याने आता या व्यवसायाला याच्या झळा बसत आहे.
हेही वाचा - अलीकडे का झाले अनेक दूध उत्पादकांचे डेअरी फार्म बंद?