Join us

पांढरं सोनं काळवंडलं! गतवर्षीच्या तूलनेत कपाशीत यंदा दोन हजारांची घट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 2:00 PM

उत्पादन कमी, मिळेना भावाची हमी...

यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने कापसाचे उत्पादन कमी प्रमाणात झाले आहे. थोड्याफार प्रमाणात असलेल्या पाण्यावर पिकवलेलं पांढरं सोनं आता भाव घसरल्याने काळवंडल्याचे दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत कापूस दरात सध्या दोन हजार रुपयांची घट झाल्याचे दिसून येत आहे.

जुलैमध्ये पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली; पण नंतर पावसाने आखडते घेतल्याने पाण्याविना पिके सुकून गेली. ज्या शेतकऱ्यांकडे थोडेफार पाणी आहे, त्यांनी पाण्यावर कपाशी बहरात आणली. दिवाळीनंतर आता बाजार समितीत कापूस खरेदी सुरू झाली असून, ७ हजार २०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे भाव मिळत आहे. दरवर्षीपेक्षा कापसाची लागवड कमी असतानादेखील भाव पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कापसाला हमीभाव ठरवून द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

केलेला खर्चही निघेना

बियाणे, खते, मशागतीवर केलेला खर्चदेखील निघत नसल्याने शेतकऱ्यांनी नेमकं शेती करायची कशी, असा प्रश्न घाटपिपरी येथील शेतकरी शाहुराज झांजे यांनी उपस्थित केला आहे.

यामुळे घटले ४ हजार हेक्टर कपाशीचे क्षेत्र

■ बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक भुर्दड सहन करावा लागतो.

■ कापूस वेचणीला मजूर मिळत नाहीत. वेचणीचा दरही १२ रुपये किलोपर्यंत वाढला आहे. त्यात बाजारात कमी भाव मिळत आहे.

■ यामुळे गतवर्षी २१ हजार हेक्टर क्षेत्रावर असलेली कपाशी यंदा १७ हजार हेक्टर क्षेत्रावर आली असून, ४ हजार हेक्टर क्षेत्र घटल्याचे तालुका कृषी अधिकारी गोरस्व तरटे यांनी 'लोकमत'ला सांगितले.

हमीभाव भाववाढीची अपेक्षा

  • पावसाचे प्रमाण कमी झाल्याने उत्पन्न घटल्याने यंदा आवक कमी झाल्याचे कडा येथील अडत दुकानदार योगेश भंडारी यांनी 'लोकमत'ला सांगितले.
  •  सध्याचा बाजारभाव ७ ते ७ हजार २०० रुपये प्रतिक्चिंटल भाव मिळत आहे.
  • गतवर्षी काही दिवस ९ हजारांपर्यंत भाव मिळाला. त्यामुळे भाववाढीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
टॅग्स :कापूसपाऊसशेतकरीबाजार