जुन्नर तालुक्यात माळशेज परिसरातील ओतूर रोहोकडी, आंबेगव्हाण, पाचघर, उदापूर, डिंगोरे, पिंपळगाव जोगा, बल्लाळवाडी, नेतवड गावांत टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या गावाची जिल्ह्यात, तालुक्यात नावाने ओळख आहे.
इतर हंगामाच्या तुलनेत हे पीक उन्हाळी हंगामात जादा क्षेत्रावर घेतले जाते. यंदाच्या उन्हाळी लागवडीचे टोमॅटो लागवडची लगबग असल्याचे चित्र माळशेज परिसरात दिसत आहे.
यंदाच्या उन्हाळी हंगामात जुन्नर तालुक्यात अनेक ठिकाणी टोमॅटोचे क्षेत्र घटले असतानाच माळशेज परिसरात क्षेत्र वाढल्याचे दिसत आहे.
इतर हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामात लागवड केल्याने केलेल्या टोमॅटोला दर चांगला मिळतो हा अनुभव कित्येक वर्षांचा असल्याने शेतकरी उन्हाळी हंगामात उत्पादन घेत असतात.
गत वर्षात शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला होता. काही दिवस २० किलोच्या कॅरेटला दर १०० रुपयांपासून एक हजार रुपयांच्या पुढे जाऊन पोहोचला होता.
सध्या गेल्यावर्षी सुरुवातीला टोमॅटोला दर नसल्याने कवडीमोल दराने शेतकऱ्यांनी विक्री केली होती त्यावेळी शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांची शेती तोट्यात गेली.
सध्याही तीच परिस्थिती शेतकरी अनुभवत आहेत. सध्या नारायणगाव टोमॅटो मार्केटला २० किलो क्रेटला २० ते ६० रुपये कवडीमोल दर मिळत असून आताच्या बाजारभावात शेतकऱ्याला वाहतूक मजुरी फिटत नाही असेही टोमॅटो उत्पादक सांगत आहेत.
१० ते १५ टक्के रोपाची उष्णतेमुळे मर होत आहेसध्या प्रचंड प्रमाणात उष्णता असून टोमॅटो लागवड केलेल्या क्षेत्रात १० ते १५ टक्के रोपाची उष्णतेमुळे मर होत आहे त्यामुळे शेतकऱ्याचे आतापासूनच मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. रोपे वाचवण्यासाठी प्रत्येक शेतकरी काहीना काही त्यामुळे उपाययोजना करत आहेत.
मी दीड एकर क्षेत्रावर टोमॅटोचे पीक घेतले असून शेत मशागत, सेंद्रिय खत, गांडूळ खत, बॅक्टेरिया व बेसल डोस टाकून नंतर बेड पाडून, ड्रीप पाईप व मल्चिंग पेपर अंथरावा लागतो, योग्य ती पाणी मात्रा देऊन, टोमॅटो लागवड करावी लागते. तार सुतळी वापरून मांडव तयार करावा लागतो. त्यात मजुरी, खत, औषधे असा एकरी खूप मोठा दीड लाख भांडवली खर्च येतो. या वर्षी गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापासून दर आहे त्यामुळे लहान मुलासारखे रोपांना जपावे लागणार आहे. पुढे पैसे होतील का नाही याची शाश्वती नाही. आम्ही कष्टावर विश्वास ठेवून शेती करतो. - अंकुश घोलप, टोमॅटो उत्पादक शेतकरी
अधिक वाचा: हळदीचे बेणे अधिक काळ टिकण्यासाठी साठवणूकीत करा हे सोपे उपाय; वाचा सविस्तर