धुळे: "आपली आई बाळाला जशी अंगाई गाते आणि बाळ छान पद्धतीने झोपतं अगदी त्याच पद्धतीने पीक हे माझं बाळ आहे आणि मी त्यांच्यासाठी या संगिताच्या माध्यमातून अंगाई गात आहे असं मला वाटतं" असं मत आहे धुळे जिल्ह्यातील गणेश चौधरी या शेतकऱ्याचं. गणेश चौधरी यांनी आपल्या शेतातील पिकामध्ये साकारात्मकता यावी आणि पिकाची वाढ जोमाने व्हावी या उद्देशाने म्युझीक थेरपीचा वापर केला आहे. त्यांच्या शेतातील म्युझीकचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
दरम्यान, गणेश चौधरी हे धुळे जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी असून ते आपल्या शेतात विविध प्रयोग करत असतात. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत जास्त मक्याचे पीक घेणारा शेतकरी म्हणून माझी ओळख असल्याचा दावा ते करतात. दरम्यान, परदेशात पिकांच्या पोषक वाढीसाठी म्युझिक थेरपीचा वापर केला जातो. हा प्रयोग आपणही करावा या हेतूने मी गेल्या काही वर्षांपासून हा प्रयोग राबवत आहे. त्यांनी शेतात साऊंड लावला असून ते आपल्या पिकांसाठी सुमधूर संगीत ऐकवतात.
सुमधूर संगिताचा केला जातो वापरशेतात दररोज पहाटे सुर्य उगवण्याच्या अगोदर आणि सायंकाळच्या दरम्यान गणेश हे संगीत लावतात. यावेळी बासरी, शास्त्रीय संगीत किंवा धूनच वाजवली जाते. कोणत्याही प्रकारचे अल्बम, बॉलीवूड, धांगडधिंगा गाणे वाजवले जात नाहीत. या संगितामुळे शेतात आणि वातावरणात साकारात्मकता तयार होते आणि याचा कुठेतरी फायदा पीक वाढीसाठी होईल असं ते सांगतात. पिकाच्या उत्पादनात फार काही फरक पडणार नाही पण टक्केवारीमध्ये थोडासा फरक पडेल अशी त्यांना खात्री आहे.
परदेशातही पिकासाठी म्युझीक थेरपीचा वापरपरदेशात मोठ्या प्रमाणात पिकांच्या वाढीसाठी म्युझीक थेरपीचा वापर केला जातो. तर यामुळे संगिताच्या लहरी पिकांपर्यंत पोहचून त्यांची चांगली वाढ होते असा समज आहे.
म्युझीकच्या लहरीमुळे बाळाला साकारात्मकता मिळते, मुक्या प्राण्यांनाही चांगले वाटते, ज्या सजीवाला भावना असतात त्या प्रत्येक सजीवाला संगीतामुळे साकारात्मकता जाणवते. संगीताच्या माध्यमातून पिकाच्या भावना जपल्या जातील असं मला वाटतं आणि मी तसा प्रयत्न करतो. मी पिकांशी बोलतो आणि पीक माझ्याशी बोलतं. यामुळे वातावरणातही साकारात्मकता जाणवते म्हणून मी दरवर्षी पिकाला संगीत ऐकवत असतो.- गणेश चौधरी (शेतकरी, धुळे)