Join us

यंदा ज्वारीपेक्षा हरभरा अन् करडई पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा वाढला कल का? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 11:04 AM

गेल्या वर्षी ज्वारीला हमीभाव तर कडब्याला म्हणावा तसा दर मिळाला नसल्याने यावर्षी शेतकऱ्यांचा ज्वारीऐवजी हरभरा अन् करडई पीक घेण्याकडे कल वाढला असल्याचे दिसून येत आहे.

विलास मासाळमंगळवेढा : चालू रब्बी हंगामात सतत पाऊस पडत असल्यामुळे ज्वारीचीपेरणी मागे-पुढे झाली आहे. ज्वारीच्या क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांकडून पेरणी केली जात आहे.

गेल्या वर्षी ज्वारीला हमीभाव तर कडब्याला म्हणावा तसा दर मिळाला नसल्याने यावर्षी शेतकऱ्यांचा ज्वारीऐवजी हरभरा अन् करडई पीक घेण्याकडे कल वाढला असल्याचे दिसून येत आहे.

मंगळवेढा तालुक्यात गेल्यावर्षी कडब्याला जिल्हाबंदी केल्यामुळे हजारो शेतकऱ्यांचा कडबा शिवारामध्ये पडून राहिला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

केलेला खर्च आणि ज्वारीचे मिळालेल्या उत्पादनातून उत्पन्नाचा कुठेच ताळमेळ लागला नाही. ज्वारी आणि कडब्याला भाव मिळत नसल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी हरभरा आणि करडईची पेरणी करण्यासाठी शेत शिवार पडीक ठेवले आहेत.

मंगळवेढा तालुक्यात यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणी करून चांगले उत्पन्न घेतले. यामध्ये सर्वांत जास्त उडीद आणि सूर्यफूल पिकाचे प्रयोग करून अधिकाधिक चांगले उत्पन्न घेऊन शेतकऱ्यांनी चांगला फायदा मिळवला व पुन्हा रब्बी हंगामासाठी शेत तयार करून ठेवले आहे.

ज्वारीच्या कोठारात केवळ ज्वारी, हरभरा, करडई, जवस, सूर्यफूल ही पिके रब्बी हंगामात घेतली जात होती; मात्र पाण्याचा सोब उपलब्ध करून अनेक शेतकऱ्यांन डाळिंब, कांदा, ऊस आदी नगर्द पिकांचा वापर करून चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

मजुरीचे वाढले दर- सध्या ज्वारीची पेरणी पूर्णपणे होत आली आहे; मात्र ही पेरणी मागे-पुढे झाल्यामुळे काही शेतकऱ्यांनी बैलजोडीने तर काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरने पेरणी केली.बैलजोडीला दिवसाकाठी साडेपाच ते सहा हजार रुपये तर ट्रॅक्टरला सहाशे ते सातशे रुपये असा रोजगार आताही मिळत आहे. तसेच ज्वारीला साडेतीन ते साडेचार हजार असा भाव प्रतिक्विंटल असून, हरभरा साडेसहा ते सात हजारापर्यंत आहे. हाच रेट करडईला आहे.मात्र, रब्बी हंगामातील हा दर शेवटपर्यंत राहत नाही. यामुळे शेतकऱ्यांनी केलेली गुंतवणूक आणि उत्पन्नाचा कुठेही ताळमेळ लागत नसल्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा करडई, हरभरा या पिकाकडे कल वाढला आहे.

ज्वारी काढणीनंतर म्हणावा तसा कडबा आणि ज्वारीला भाव मिळत नाही. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांचा कल गेल्या वर्षीच्या तुलनेत बदलला असून, बऱ्यापैकी शेतकरी हरभरा आणि करडई या पिकाकडे वळला आहे. - डॉ. राजकुमार बरगे, शेतकरी, लक्ष्मी दहिवडी

ज्वारीचे कोठार म्हणून ओळख असणाऱ्या मालदांडी ज्वारीला खाण्यासाठी लोकांकडून भरपूर मागणी असते; परंतु शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून हमीभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी यावर्षी हरभरा पिकाची जास्त पेरणी करीत आहे. - हनुमंत दुधाळ, शेतकरी, तळसंगी

टॅग्स :रब्बीपीकज्वारीकरडईहरभराशेतकरीशेतीपेरणीसोलापूर