पावसाळा हा ऋतू सर्वांनाच सुखद आणि आल्हाददायक वाटतो; या दिवसात सापांच्या संख्येत वाढ होत असल्याने मनुष्य वस्तीशेजारी त्यांच्या अस्तित्त्वाचा धोका वाढतो. पावसाळ्यात त्यांचे वस्तीस्थान पाण्याखाली जाते. त्यामुळे साप निवाऱ्यासाठी लोकवस्तीत येत असल्याने सर्पदंशाचा धोकाही वाढतो.
या सापांपासून आपल्या परिवाराचे संरक्षण करून सापांना परिसरातून दूर ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. शहरी व ग्रामीण भागात तसेच डोंगर व जंगलव्याप्त भागात राहणाऱ्या नागरिकांनी या गोष्टीची पुरेपूर काळजी घ्यावी, असे वन्यजीव अभ्यासकांचे मत आहे.
घराजवळ साप आढळल्यास काय करावे?
घर व परिसरात सापाचे दर्शन झाल्यास घाबरू नका. सापाच्या जवळ जाऊ नका आणि हाताळू नका. सुरक्षित अंतरावरून सापाचा व्हिडीओ आणि फोटो काढा. कारण यामुळे जाणकारांना सापांची योग्य माहिती मिळते. सुरक्षिततेसाठी तसेच साप पकडण्यासाठी संबंधित विभागाशी संपर्क साधा. साप स्वतःहून पकडण्याचा प्रयत्न करू नका, असे करणे जिवावर बेतू शकते.
अशी करा स्वच्छता
• घर आणि परिसर : घर आणि शेजारील परिसर स्वच्छ ठेवा. ओलावा आणि अडचण घराशेजारी राहणार नाही, याची दक्षता घ्या.
• वाढलेले गवत : घराजवळ वाढलेले गवत वेळीच कापा.
• उंदीर : सापांनाचा आकर्षण होण्याचे एक कारण म्हणजे उंदीर. घराभोवती उंदीर नियंत्रणाची उपाययोजना करा.
• सांडपाणी : घरातील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावावी, कारण या खरकट्यावर रात्रीच्या वेळीस उंदीर येतात आणि उंदरांच्या मागे साप.
• पक्ष्यांचे खाद्य : घरात जर पाळीव पक्षी, कोंबड्या असल्यास त्यांचे खाद्य योग्य ठिकाणी ठेवा. जमिनीवर पडलेले अन्न उंदरांना आकर्षित करते.
घ्यावयाची खबरदारी
बागेत गवत वाढू देऊ नका. घराशेजारी भिंतीला लागून कोणताही मलबा, लाकडाचे ढीग किंवा दगडांचा ढीग असल्यास तो हटवा. घराभोवती पाणी साचणार नाही, याची काळजी घ्या. पावसाळा हा सर्व प्रकारच्या बेडकांचे प्रजनन काळ असल्याने, साचलेली डबकी ही बेडकांचे प्रजनन स्थान बनू शकते आणि बेडूक हे सापाचे खाद्य असल्याने साप याकडे आकर्षित होतात. घराच्या भिंती, दरवाजांना जर बिळे, फटी किंवा उभट खाचा असतील तर त्या बुजवून घ्या. रात्रीच्या वेळी अंधारात वावरताना, बागेत किंवा गवताळ भागात चालताना बूट आणि लांब पँट घाला.
साप पकडणे आणि त्याना मारणे हे वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हा आहे, वन्यजीव कायदा १९७२ अंतर्गत प्रत्येक भारतीय सापाची प्रजाती ही संरक्षित करण्यात आली आहे. त्यामुळे सापांना मारणे किंवा त्यांना पकडणे हे कायद्याने गुन्हा आहे. पावसाळ्यात सापांपासून सुरक्षिततेसाठी अधिक दक्षता आवश्यक आहे. स्वच्छता राखून, आपले घर सुरक्षित करून, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून आणि प्रबोधन करून आपण सापांचा धोका कमी करू शकतो. - अमित सय्यद, वन्यजीव संशोधक