नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील शेतकरी बांधव नवनवीन विविध कंपनींचे कापूस, तूर, सोयाबीन व इतर बियाणे खरेदीसाठी तेलंगणा राज्यात जात असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.
माहूर ते आदिलाबाद हे ७० किमी अंतर असून, माहूर तालुका हा आदिवासी बहुल अतिदुर्गम भाग आहे. तेलंगणातील आदिलाबाद हा जिल्हा असून, कृषीची मोठी बाजारपेठ आहे. तेलंगणा आणि महाराष्ट्र या कृषी बाजारपेठेतील कृषी बियाण्यांच्या दरात मोठी तफावत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. त्यामुळे कमी किमतीत बियाणे उपलब्ध होत असल्याने शेतकरी वर्ग तेलंगणा राज्यातील आदिलाबाद कृषी बाजारपेठांकडे वळला गेला आहे.
माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात कापूस, तूर, सोयाबीन, उडीद मूग आदी लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच स्थानिक वाणांपेक्षा नवनवीन संकरित वाणांना शेतकरी यंदा पसंती देताना दिसत आहेत. बाहेरील वाण स्थानिक वाणांपेक्षा उच्च असल्याचा विश्वास शेतकरी असल्याने शेतकरी वर्ग तिकडे आकृष्ट झाला आहे. त्यामुळे शेतकरी बांधव स्थानिक बाजारपेठेपेक्षा तेलंगणातील कृषी बाजारपेठेला अधिक पसंदी देत असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यात चढ्या दराने कृषी बियाण्यांची विक्री होत असल्यामुळे महागडे बियाणे घेतल्यास पुढील हंगाम कसा चालवायचा? हाही प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे किमतीत जाण्या-येण्याचा खर्च निघून परवडणारे बियाणे शेतकरी तेलंगणात जाऊन घेत आहेत. यामुळे तेलंगणा राज्यातील कृषी बाजारपेठांचे आर्थिक चक्रही गतिमान झाले आहे.
मागील अनेक वर्षांपासून हा प्रकार माहूर तालुक्यात सुरू असून, शेतकरी दरवर्षी तेलंगणातील बियाणे लागवड करतात. या कारणाने स्थानिक बाजारपेठेत पाहिजे तशी गर्दी दिसून येत नाही. मात्र, परराज्यातील बियाणे खरेदीदरम्यान बरेचदा बोगस बियाणे येत असल्याने फसवणूक प्रकार होत असल्याचे अनेक प्रकार घडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच सावधान होणे गरजेचे असल्याचे मत कृषी विभागाने केले आहे.
दरात तफावत असल्याने वळले शेतकरी
वानोळा, कुपटी, मलकागुडा, वाई बा., मेंडकी, मुंगशी, रामपूर, मांडवा, पानोळा, दहेगाव साकुर आदी परिसरातील शेतकरी आदिलाबाद बाजारपेठांचे अंतर कमी असल्याने व बियाण्यांचा दरात तफावत असल्यामुळे त्याठिकाणी जाताना दिसून येतात.
हेही वाचा - जांभळाची अशी आरोग्यदायी माहिती जी या आधी नसेल वाचलेली