नोकरी व्यवसायासाठी शहरात जाणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने गावातील लोकांची संख्या घटली आहे. त्यातच महामार्गासाठी जमिनींचे अधिग्रहण करत मोबदला मिळत असल्याने खातेदार जागरुक झाले आहेत. कसणाऱ्या शेतकऱ्यांकडे आता जमिनी एकरात नाही तर गुंठ्यात उरल्या आहेत. कोकणातील अनेक भागात हे वास्तव झाले आहे.
पूर्वी एकरात शेती करणारे शेतकरी आता गुंठ्यात शेती करत आहेत. कोकणात काही भागात बारमाही शेती केली जाते तर काही भागात क्षेत्र पडीक ठेवले जात आहे. वन्य प्राण्यांचा उपद्रव, हवामानातील बदलामुळे उत्पादकतेवर परिणाम होत आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. ४-५ वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात येत होती यावर्षी ६१ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड केली असून लागवडीच्या क्षेत्रात घट झाली आहे.
भूसंपादन वाढलेमुंबई-गोवा महामार्गासाठी संपादन मुंबई-गोवा महामार्ग चार पदरी करण्यात येत असल्याने रस्ता रुंदीकरणासाठी जमिनीचे संपादन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, हजारो हेक्टर जमिनीचे संपादन केले आहे.
समृद्धी महामार्गनागपूर मुंबई या समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरु आहे. सहापदरी रस्ता करण्यात येत असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने जमिनी संपादन केल्या जात आहेत. जमिनी संपादन करताना शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळत असल्याने शेतकरीही तयार होत आहेत.
शेतीक्षेत्र का घटले?
- घराघरात वाटण्या : शेतकऱ्यांच्या वारसदारात दरवर्षी वाटण्या होत आहेत. त्यामुळे जमिनीच्या क्षेत्रात घट झाली आहे. खातेदारांची संख्या मात्र वाढली आहे.
- भूसंपादन : मुंबई- गोवा महामार्ग, नागपूर मुंबई महामार्गासाठी भूसंपादन करण्यात येत असल्याने क्षेत्र घटले आहे.
- शेत विक्री वाढली : नोकरी व्यवसायासाठी शहराकडे स्थलांतर केल्याने गावातील संख्या घटली आहे. पडीक जमीन विक्री करून पैसे मिळविण्याची वृत्ती वाढल्याने जमिनी कमी झाल्या.
अत्यल्प भूधारकांच्या संख्येत वाढ....कंपन्या, धरण, महामार्गासाठी जमिनींचे अधिग्रहण केले जाते. ७/१२ वर नावे अधिक असल्याने खातेदारांच्या संख्येत वाढ होते. वाद असल्यामुळे मोबदला मिळविताना अडचणी येत आहेत. जिल्ह्यात अत्यल्प भूधारकांच्या संख्येत वाढ झाली असून वाट्याला आलेले क्षेत्र काही गुंठ्यातच आहे.- सुरेश महाडिक
प्रकल्प, महामार्ग, धरणांसाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांचे पुनर्वसन होत नसल्याने शेतकन्यांमध्ये नाराजी आहे. आधीच जमिनी कमी त्यात वाटण्या अधिक असल्यामुळे शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेली जागा कमी आहे. त्यामुळे अत्यल्प भूधारकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ झाली आहे. - चंद्रकांत कोलगे