Join us

भारतात मसूर डाळीची आयात का घटली?

By मुक्ता सरदेशमुख | Published: September 29, 2023 4:32 PM

भारतात नेहमीच्या वापरातली आणि अत्यावश्यक असणाऱ्या मसूर डाळीची आयात घटली आहे. मसूर डाळीसाठी भारत कॅनडा या देशावर अवलंबून आहे. ...

भारतात नेहमीच्या वापरातली आणि अत्यावश्यक असणाऱ्या मसूर डाळीची आयात घटली आहे. मसूर डाळीसाठी भारत कॅनडा या देशावर अवलंबून आहे. कॅनडा आणि भारतातील राजनैतिक तणावामुळे भारतात मसुरीची आयात मंदावली आहे. परिणामी, भारतात मसूर डाळीची टंचाई निर्माण होऊ शकते. व देशांतर्गत अन्नधान्याच्या किमती वाढवू शकतात.  

खलिस्तानी नेता हरदीप सिंग निजरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडा या देशातील राजनैतिक तणाव वाढला आहे. मागील  आठवड्यात कॅनडाच्या भूमीवर झालेल्या खलिस्तानी नेत्याच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा संशय कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टूड्रो यांनी व्यक्त केला. त्यानंतर कॅनडातून भारताला निर्यात होणारी मसूर विक्री मंदावली आहे. ही विक्री मंदावल्याने भारतातील अन्नधान्यांच्या किमती वाढू शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे. 

भारतात कुठे होते मसूर उत्पादन?

भारतात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, छत्तीसगड झारखंड या या राज्यांमध्ये मसुरीचा उत्पादन सर्वाधिक होत असले तरी भारताला मसूर डाळीची आयात कॅनडामधून करावी लागते. 

भारतातील खराब पिकामुळे तसेच प्रमुख उत्पादक राज्यांमधील अनियमित मान्सूनमुळे घटलेल्या एकरी क्षेत्रामुळे मसूरच्या किमती जास्त असल्याचे पुरवठादार सांगतात. परंतु कॅनडा-भारताच्या राजनैतिक संबंधांमध्ये तणाव झाल्यापासून मसुरीची आयात  सहा टक्क्यांनी घटली आहे. भारत दरवर्षी सुमारे २.४ दशलक्ष मॅट्रिक टन एवढी मसूर वापरतो. त्यातील स्थानिक उत्पादन केवळ 1.6 दशलक्ष टन एवढेच आहे. परिणामी भारताला मसूर  आयात करावी लागते. 

2022- 23 या आर्थिक वर्षात भारताच्या एकूण मसूर आयातीपैकी निम्म्याहून अधिक आयात ही कॅनडामधून झाली आहे. एप्रिल ते जुलै या कालावधीत भारतातील कॅनेडियन मसूरच्या आयात एक वर्षांपूर्वीच्या तुलनेत 420 टक्क्यांनी वाढली आहे, असे रायटर्स या वृत्त संस्थेने सांगितले.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपीकलागवड, मशागत