Join us

होळीला पुरणाची पोळीच का? काय आहे त्यामागचे गमक...?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 12:34 PM

खमंग भाजलेल्या पुरणाच्या पोळीचा होळीदिवशी विशेष मान. शेती आणि पदार्थांचा संबंध फार जवळचा. खरीप रब्बी हंगामाच्या चक्रांवर अवलंबून असणाऱ्या, शेतात येणाऱ्या नव्या पिकांचा वापर करत शेतकरी आपली कृतज्ञता व्यक्त करतो.

होळी रे होळी पुरणाची पोळी' अशी जुनी घोषणा रूढ आहे. लहानपणी अनेकांनी ती ऐकलीही असेल. होळीच्या दिवशी पुरणाची पोळी केली जाते आणि या पोळीचा नैवेद्य होळीला दाखविला जातो. अशी प्रथा आपल्या सर्वांना माहीत आहे. पण, होळीच्या दिवशी पुरणाची पोळीच का? त्यामागे नेमके काय गमक आहे, हे आपण जाणून घेऊ या..

रा ज्यभरात होळी किंवा शिमगा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनेक वाईट प्रवृत्तींचा होळीच्या अग्नीत त्याग केला जातो. वाईट प्रवृत्तीवर मिळावलेल्या विजयाचा आनंद म्हणून घराघरांत पुरणपोळीचा बेत आखला जातो. भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे भारतात साजरे केलेले जाणारे सर्व सण किंवा सणांच्या दिवशी बनविण्यात येणारे खाद्यपदार्थ कृषी कालगणना यांच्याशी संबंधित असते. शेतात प्रत्येक हंगाम किंवा ऋतूनुसार येणाऱ्या पिकांवर नैवेद्य दाखविला जातो. होळी हा सण साधारणपणे मार्च महिन्यात येतो. मार्च महिन्यात रब्बी पिकांची कापणी होते. रब्बी पिके म्हणजे जी पिके थंडीच्या काळात नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान घेतली जातात, तर कापणी ही फेब्रुवारी ते मार्च दरम्यान होते. पुरणपोळीसाठी वापरण्यात येणारे गहू आणि चणा डाळ ही रब्बीची पिके आहेत. तसेच उसापासून तयार होणारी साखर किंवा गूळही या काळात मुबलक प्रमाणात असतो. या नवीन कापणी केलेल्या पिकांचा वापर करून विधिवत प्रसाद बनवून तो देवाला अर्पण केला जातो.

घरात कोणती नवी गोष्ट विकत घेतल्यानंतर ती सर्वप्रथम देवासमोर ठेवली जाते. त्याप्रमाणेच शेतकरीदेखील आपल्या शेतात पिकलेले पदार्थ देवाला अर्पण करतात. त्यामुळे आलेल्या पिकांचा प्रसाद देवाला दाखवला जातो. भारत हा कृतज्ञताप्रधान देश आहे. नवीन पिकांचा वापर करत शेतकरी आपली कृतज्ञता व्यक्त करतो. म्हणून होळीला पुरणपोळी केली जाते. वर्षभर लोक होळीच्या सणाची वाट पाहतात. काही ठिकाणी होळी सणाची महिनाभर अगोदर तयारी सुरू होते. हिंदू पंचांगानुसार होलिका दहन है फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्ष पौर्णिमेला केले जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण केली जाते.

शंभर वर्षांनंतर चंद्रग्रहण

यंदा तर १०० वर्षांनंतर होळीच्या दिवशी चंद्रग्र- हणाचा योग जुळून आला आहे. पंचांगानुसार, फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला २५ मार्च रोजी या नव्या वर्षातील पहिले चंद्रग्रहण होणार आहे.

एक, दोन नव्हे तर १०० वर्षानंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग जुळून आला आहे. त्यामुळे वर्षातील पहिले ग्रहण हे अतिशय खास असणार आहे.

टॅग्स :अन्नहोळी 2024