बीड :
शेळी, मेंढीपालनासाठी राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या वतीने जागा खरेदीसाठी अनुदान मिळणार आहे.तसेच, मेंढ्यांसाठी चराई अनुदान व कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान दिले जात आहे. त्याचे पोर्टल गुरुवारपासून सुरू झाले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या वतीने शेळी-मेंढीपालनासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेंतर्गत स्थायी व स्थलांतरित पद्धतीने मेंढीपालनासाठी पायाभूत सोयीसुविधांसह २० मेंढ्या व एक मेंढा अशा मेंढी गटाचे वाटप ७५ टक्के अनुदानावर करण्यात येणार आहे.
या योजनेंतर्गत मेंढी गट वाटप योजनेचे लाभार्थी नसलेल्या, परंतु स्वतःच्या मेंढ्या आहेत, अशा लाभार्थ्यांसाठी देखील घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
सुधारित प्रजातींच्या नर मेंढ्यांचे ७५ टक्के अनुदानावर वाटप, मेंढीपालनासाठी पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५ टक्के अनुदान, मेंढीपालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५ टक्के अनुदान, हिरव्या चाऱ्याचा मुरघास करण्यासाठी, गासड्या बांधण्याचे यंत्र खरेदीसाठी ५० टक्के अनुदान तसेच पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी ५० टक्के अनुदानाच्या या घटकात समावेश केला आहे. इच्छुकांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मेंढ्यांसाठी चराई अनुदान किती मिळणार?
ज्या मेंढपाळ कुटुंबाकडे किमान २० मेंढ्या व एक नर मेंढा इतके पशुधन आहे, अशा कुटुंबांना जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीसाठी प्रतिमाह ६ हजार रुपये याप्रमाणे एकूण २४ हजार रुपये चराई अनुदान वाटप करण्यात येणार आहे.
कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी- संगोपनासाठी काय?
चार आठवडे वयाच्या सुधारित देशी प्रजातीच्या १०० कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी तसेच संगोपनासाठी कमाल ९ हजार रुपयांच्या मर्यादित ७५ टक्के अनुदान दिले जाणार आहे.
जागेसाठी किती अनुदान कसे मिळू शकते?
अर्ध बंदिस्त, पूर्ण बंदिस्त शेळी-मेंढीपालनासाठी भूमिहीन मेंढपाळ कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याला जागा खरेदी करण्यासाठी अनुदानाची रचना केली आहे. जागेच्या किमतीच्या ७५ टक्के अथवा किमान ३० वर्षांसाठी भाडेकरारावर जागा घेण्यासाठी भाड्यापोटी द्यावयाच्या रकमेच्या ७५ टक्के रक्कम एकवेळचे एकरकमी अर्थसाहाय्य म्हणून कमाल ५०० रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
कोठे संपर्क कराल?
पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या या योजनेबाबत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त तसेच जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंर्धन अधिकाऱ्यांशी इच्छुकांना संपर्क करता येईल.
लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या योजनेचा भज- क प्रवर्गातील १८ ते ६० वयोगटातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी २६ सप्टेंबर २०२४ पर्यंत ऑनलाइन अर्ज करून लाभ घ्यावा. - विजय देशमुख, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, बीड
जिल्ह्यातून दाखल अर्ज
महामेष योजना | ८१ |
चराई अनुदान | ४७ |
कुक्कुट खरेदी, संगोपन | ४० |
जागा खरेदी | ५ |