वळीव पावसाच्या हजेरीने मशागतीच्या कामांना वेळेत सुरुवात झाली आहे तर दुसरीकडे हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. गेल्या सात- आठ वर्षांत हुमणीच्या प्रादुर्भावामुळे ऊस, सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तीस ते चाळीस टक्के उत्पादन घटले. त्यामुळे प्राथमिक अवस्थेत बंदोबस्त व्हावा, यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. मे महिन्यात ठिकठिकाणी जवळपास सहा ठिकाणी वादळी वाऱ्यासह वळीव पाऊस झाला.
असा पाऊस झाला की, जमिनीतील भुंगे सूर्यास्तानंतर बाहेर पडतात. ते बाभूळ, कडुनिंब किंवा बोर झाडावर पाने खाण्यासाठी बसतात. या भुंग्यापासूनच पुढे जमिनीत हुमणीची अळी तयार होते. भुंगे हे गडद तपकिरी रंगाचे असतात.
तर अळी ही गडद तपकिरी तोंड असलेली पांढऱ्या रंगाची सी आकाराची असते. याचा प्रादुर्भाव हळूहळू दिसून येतो. अंडी मोठ्या प्रमाणात जमिनीत घालतात. त्यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव झपाट्याने विस्तारतो.
मुळातच मे-जून महिन्यातच निर्मितीच्या अगोदर प्राथमिक टप्प्यात हुमणीचा बंदोबस्त करणे शक्य होते. या कारणास्तव कृषी विभागाने त्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. खरीप हंगामाच्या तयारीबरोबरच त्याच्या नियंत्रणासाठी प्रबोधन, प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना दाखविली जात आहेत.
जिथे मोटार पंप आहेत तिथे प्रकाश सापळे लावावेत, असे आवाहन कृषी विभाग करीत आहे. सापळा लावण्यासाठी पाच बाय चार आकाराचा १ फूट खोल खड्डा काढावा. पिवळा प्लास्टिकचा कागद लावून त्यावर १०० वॉट बल्ब लावावा. सायंकाळी सहा त आठ या वेळेत सापळा लावला जावा, या प्रकाशाकडे भुंगे आकर्षित होतात. ती नष्ट करता येतात. त्यामुळे हुमणी अळीचा बंदोबस्त तसेच नियंत्रण करता येते.
हातकणंगले तालुक्यात ऊस व सोयाबीन पिकाचे क्षेत्र जास्त आहे. गेल्या पाच वर्षांत हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्पादन घटल्यामुळे शेती तोट्यात आली. विशेष म्हणजे अळीचा प्रादुर्भाव झपाट्याने होतो. नियत्रंण करणे अवघड होऊन बसते. त्यामुळे प्राथमिक टप्प्यात नियत्रंण होणे गरजेचे असते. - सुरेश अप्पासाहेब पाटील, शेतकरी, लाटवडे
अधिक वाचा: तुमच्या विहिरीला पाणी कमी येतंय पावसा अगोदर करा हे नियोजन