कडधान्यांसाठी ठिबक सिंचनाचा उपयोग करण्यासाठी येत्या काळात ठिबक निर्मात्या कंपन्यांसोबत करार करणार असून याबाबतीत अधिकाधिक जागृती करणार असल्याचे मनोगत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्र मनी यांनी व्यक्त केले.
कडधान्यांची उत्पादकता आणि क्षेत्र या दोन्हीमध्ये वाढ करण्यासाठी उत्तम वाणांबरोबरच पीक व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी अधिकाधिक लक्ष देण्याची गरज ही त्यांनी व्यक्त केली. भारत सरकारने २०२७ पर्यंत भारताला कडधान्यांमध्ये स्वयंपूर्ण करण्याचा संकल्प घेतला आहे. याला अनुषंगून अधिकाधिक शेतकऱ्यांनी कडधान्याची लागवड आधुनिक करावी, असेही आवाहन त्यांनी केले.
कडधान्याची उत्पादकता वाढविण्यासाठी नियोजन गरजेचे
सन 1951 मध्ये भारतामध्ये साधारणतः आठ दशलक्ष टन कडधान्याचे उत्पादन होत होते ते आज मितीस जवळपास 25 दशलक्ष टणापर्यंत पोहोचले आहे असे कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉक्टर जाधव केटी यांनी त्यांच्या प्रास्ताविकात सांगितले. तथापि उत्पादन वाढले असले तरी प्रति मानसी 1951 मध्ये 22 किलोग्रॅम प्रतिवर्षी कडधान्याची उपलब्धता होती, तर ती सध्या कमी होऊन 16 किलो ग्रॅम प्रतिवर्षी असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
तसेच कडधान्यांकरिता सिंचनाची सोय अत्यंत कमी प्रमाणात असून ती देशात केवळ 21% क्षेत्रावर तर महाराष्ट्रात केवळ 11 टक्के क्षेत्रावर आहे. इतर अन्नधान्यांच्या बाबतीत सिंचनाचे क्षेत्र ५१ टक्के पर्यंत आहे. एकंदरीतच कडधान्याची उत्पादकता वाढवण्यासाठी उत्तम वाण, खत-पाणी आणि कीड व रोग व्यवस्थापनाचे अधिक चांगले नियोजन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
एक नव्हे, दोन वाणांची करा निवड
डॉक्टर दीपक पाटील यांनी शेतकऱ्यांनी सरसकट एकच वाण न निवडता शक्य असल्यास आपल्या शेतामध्ये दोन वाणांचा वापर करण्याची सूचना केली. तसेच शेतकऱ्यांनी आपल्याकडे सिंचनाची सोय आणि जमिनीची प्रत पाहून तुरीच्या वाणाची निवड करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
यामध्ये बीडीएन ७११ हा वाण जिरायत क्षेत्रासाठी तर गोदावरी हा वाण बागायती क्षेत्रासाठी शेतकऱ्यांनी घ्यावा असा सल्ला दिला. बदलत्या हवामानामध्ये कडधान्याचे पीक अधिक फायदेशीर असून कमीत कमी पाण्याची गरज आणि आवर्षण खंडामध्ये कडधान्याचे उत्पादन शाश्वत असते यामुळे शेतकऱ्यांनी तूर आणि हरभरा यासारखे कडधान्य यापुढे अधिकाधिक घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
रसायनांचा वापर करा कमी
डॉक्टर ज्ञानदेव मुटकुळे आणि डॉक्टर प्रशांत सोनटक्के यांनी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाबद्दल माहिती दिली. जैविक तंत्रज्ञानाचा अधिक अधिक वापर करून रासायनिक औषधांचा कमीत कमी वापर करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
सुरुवातीच्या काळामध्ये जैविक घटकांचा वापर आणि आर्थिक नुकसानीच्या पातळीनुसार रासायनिक औषधांचा वापर परिणामकारक ठरतो असे त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.डॉक्टर पीए पगार यांनी पिकांचा फेरपालट आणि मूग आणि उडदाच्या योग्य वाणांची निवड करत कडधान्यांचे पिकाचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्या साठी शेतकऱ्यांनी आंतरपीक पद्धतीचा वापर करण्याची सूचना केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश उदावंत आणि आभार प्रदर्शन डॉक्टर पीए पगार यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी डॉक्टर प्रशांत सोनटक्के, डॉक्टर व्ही के गीते, डॉक्टर एस बी कदम आणि इतर कर्मचारी तथा शास्त्रज्ञ यांनी विशेष परिश्रम घेतले.