पुणे : खरिपाचा हंगाम सुरू झाला असून खते आणि बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांच्या फसवणुका होत असल्याचं आढळून आलं आहे. स्वराज्य पक्षाकडून वाढीव दराने खते विकणार्यांविरोधात स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. यावेळी २६६ रूपयांची युरियाची गोणी ८०० रूपयांना विक्री होत असल्याचं लक्षात आलं असून या विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.
दरम्यान, खरिपामुळे शेतकरी पेरण्या आणि लागवडीच्या तयारीला लागले असून विक्रेत्यांकडून खते खरेदीमध्ये शेतकऱ्यांची सर्रासपणे लूट केली जात आहे. या पार्श्वभूमीवर स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी पुणे शहरात मार्केट यार्ड परिसरातील खत विक्री दुकानांमध्ये जाऊन युरिया खरेदी केला.
यावेळी २६६ रुपयांना मिळणारी गोणी तब्बल ८०० रुपयांना विकत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पदाधिकाऱ्यांनी सदरील घटनेबाबतचे व्हिडिओ चित्रिकरण केलेले आहे. तसेच खरेदी केल्याचे बिल देखील मिळालेले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वाढीव दराने खते व बियाणे विकणार्या विक्रेते, डीलर व सहभागी अधिकाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. त्याचबरोबर, "कृषी मंत्र्यांनी ग्राऊंडवर येऊन काम करणे अपेक्षित असताना व्हाट्सअप वरून ऑनलाईन तक्रारी मागवणे त्यांच्याकडून अपेक्षित नाहीये. राज्यभरात शेतकऱ्यांना अशाप्रकारे लुटले जात असताना कृषी खाते झोपा काढत आहे का?" अशीही टीका त्यांनी केली आहे.
शेतकरी हेल्पलाईनस्वराज्य पक्षाच्या वतीने शेतकरी हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून या हेल्पलाईन च्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध भागांमधील अनेक सामान्य शेतकऱ्यांनी शेतीसाठी लागणारी खते, बी बियाणे, युरिया यांची वाढीव दराने विक्री केली जात असल्याच्या असंख्य तक्रारी केल्या असल्याचं सांगण्यात आलं आहे.