नरेंद्र जावरे
चिखलदरा : जंगली झेंडूची लागवड शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. कारण देशी-विदेशी बाजारपेठेत जंगली झेंडू पिकाची मागणी सर्वाधिक आहे. जंगली झेंडूच्या फुलांपासून आणि पानांपासून तसेच बियांपासून सुगंधित तेल काढले जाते.
याशिवाय त्याच्या फुलांचा वापर अत्तर आणि अनेक प्रकारची कीटकनाशके बनवण्यासाठी केला जातो. शेतकरी अगदी सहज शेती करू शकतात. कारण शेतकऱ्यांना त्याच्या लागवडीकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही.
महाराष्ट्र- मध्य प्रदेशमेळघाटच्या सीमारेषेवरील पठारावर फुललेल्या जगनीच्या पिवळ्या फुलांनी. दुर्मीळ, परंतु आदिवासींचे पारंपरिक पीक असलेल्या जगनीच्या फुलांनी पर्यटकांना मोहिनी घातली आहे.
रस्त्याने दिसणाऱ्या या शेतीत अनेक पर्यटक कुतूहलाने पाहून त्याची माहिती जाणून घेत आहेत. मेळघाटातील आदिवासी व गवळी समाजाची वेगळी संस्कृती आहे.
पोशाख, पहेराव, बोलीभाषा, पारंपरिक पिकेही वेगळी आणि दुर्मीळ आहेत. कालांतराने शैक्षणिकदृष्ट्या होत असलेला बदल, निसर्गाचा लहरीपणा व आर्थिकदृष्ट्या परवडण्याची बाब म्हणून सोयाबीन, गहू, मका, ज्वारी, धान अशी पिके धारणी, चिखलदरा तालुक्यात सर्वाधिक प्रमाणात घेतली जात आहे. पौष्टिक असणारी पारंपरिक पिके आता दुर्मीळ झाली आहेत.
अशी करतात पेरणी
मेळघाटातील आदिवासी व गवळी बांधवांची उंच-सखल टेकड्यांवर दगड मुरुमांची शेती आहे. त्यामध्येच पारंपरिक व इतर पिके घेतली जातात. जगनी पिकाची पेरणी २५ जून ते १० जुलैपर्यंत केली जाते. १०० ते ११० दिवसांचे हे पीक आहे. जगनीची पिवळी फुले दहा दिवस शेतात मोठ्या डौलाने पिकावर डोलतात. सध्या ही फुले मोठ्या दिमाघात उभे असून ती सर्वाच्या आकर्षणाचे केंद्र ठरतात.
आयुर्वेदिक व गुरांसाठीही महत्त्वाचे तेल
* जगनी पिकाच्या बियांपासून तेल काढले जाते. हे तेल आयुर्वेदात महत्त्वाचे मानले जाते. हात-पायांच्या दुखण्यावर हे तेल चांगला उपाय आहे.
* स्वयंपाकात तेलाचा वापर मेळघाटातील आदिवासी गवळी बांधव उपयोग करतात. गुराढोरांनासुद्धा तेल पाजल्याने मोठ्या प्रमाणात रोगराई दूर होते.
* प्रसूतीदरम्यान तसेच लहान मुलांना मालिश करण्यासाठी या तेलाचा उपयोग केला जातो.
कोदो, कुटकी, जगनी, मांडगी
* कोदो, कुटकी, जगनी, मांडगी अशा अनेक पौष्टिक, सर्वाधिक जीवनसत्त्व असलेल्या पिकांसाठी मेळघाटची शेतीसुद्धा दुर्मीळ झाली आहे.
* मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून वैराट, चुरणी, मेमना, पस्तलई, अशा अनेक गावांचे पुनर्वसन झाल्याने हे पीक पेरणीचे प्रमाण अत्यल्प झाले आहे.
* डोंगरावरील चिखलदरा तालुक्यासह लगतच्या मध्य प्रदेशातील कुकरू, खामला, देडपाणी, काटकुंभ, चुरणी परिसरात प्रत्येक गावातून दोन ते तीन शेतकरी जगनीसह इतरही पारंपरिक पिकांची पेरणी करताना दिसून आले.